विशाल सोनटक्के , उस्मानाबादतेरखेडी तोट्याशिवाय दिवाळी नाही..असा एक काळ होता.मराठवाड्याची शिवकाशी अशी आज या गावाची ओळख झाली आहे. मात्र हे फटाके आता तेथील मजुरांच्या जीवावरच उठले आहेत. पैशाच्या मागे लागलेले कारखानदार. त्यांना लाभत असलेली सावकारी-राजकारण्यांची साथ आणि ढिम्म प्रशासन. अशा त्रिकुटाच्या अभद्र साखळीमुळे मराठवाड्याच्या शिवकाशीतील हे कारखाने फटाक्याऐवजी आता मृत्यूचे कारखाने ठरत आहेत. उस्मानाबादपासून ३५ किमीवर येरमाळा आहे. आणि तेथून अवघ्या आठ किलोमीटरवर तेरखेडा. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील या गावात तशी नेहमीच वर्दळ. फटाका उद्योगामुळे ती आणखीनचं वाढलेली. अॅटमबॉम्ब, आवाजी आदल्या, फुलबाजे, नळे तसेच दोन प्रकारचे फॅन्सी अॅटमबॉम्ब तेरखेड्यात बनविले जातात. बाकीचे सर्व फटाके शिवकाशीहून आणून त्याची विक्री केली जाते. काही वर्षापूर्वी तेथे फटाक्याचे मोजकेच कारखाने होते. मात्र अलिकडील काळात ही संख्या तब्बल १८ वर गेली असून, सुमारे ५०० ते ६०० कामगार तेथे कार्यरत आहेत. यापैकीच ‘वेलकम’ आणि ‘प्रिन्स’ या दोन कारखान्यात मंगळवारी स्फोट झाले. आणि बघता-बघता नऊ जणांचा मृत्यू झाला. प्रिन्स फायर वर्क्स येथे दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास स्फोट झाला. त्याचा आवाज तीन-चार किमीवर असलेल्या तेरखेड्यात पोहोचला होता. याच वेळी या परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे माहिती झाल्यानंतरही मदत वेळेवर पोहोचू शकली नाही. अर्ध्या तासाच्या फरकाने प्रिन्स कारखान्यापासून सुमारे दोन किमीवर असलेल्या वेलकम फायर वर्क्स येथेही असाच स्फोट झाला. तुफानी पावसामुळे वेलकम कारखान्याकडे जाणे मुश्किल झाले होते. कारखान्याच्या रस्त्यावर असलेली तेरणा नदी तुडुंब वाहत असल्याने ग्रामस्थ नदीच्या तिरा अलीकडेच अडकले. सायंकाळी सहाच्या सुमारास काहीजण वेलकम कारखान्यापर्यंत पोहोचले. तेथील दृष्य अंगावर थरकाप आणणारे होते. एका चार वर्षीय चिमुरडीसह सहा जणांचा येथे होरपळून अक्षरश: कोळसा झाला होता. दुसरीकडे प्रिन्स कारखान्यातील मृतांची संख्याही वाढत होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलीस तेथे पोहोचले आणि त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्याचे तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याचे काम सुरू झाले. गावात तीन जेसीबी मशीन आहेत. मात्र दुर्घटना घडल्यानंतर एकही मशीन घटनास्थळाकडे आली नसल्याची खंत अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली. पोलीस तसेच प्रशासन तेथे आल्यानंतर मदतकार्याला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. दोन्ही स्फोटात ८ मजुरांसह वेलकम फायर वर्क्स कारखान्याच्या चार वर्षीय चिमुरडीचा या दुर्घटनेत बळी गेला. तेरखेड्यातील फटाका कारखान्यात झालेला हा काही पहिलाच स्फोट नाही. यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्या आहेत. काही दिवस या अपघाताची चर्चा होते आणि त्यानंतर ‘येरे माझ्या मागल्या...’ प्रमाणे सारे व्यवहार सुरळीत होतात. मात्र या अपघाताचे ना कारखानदारांना शल्य आहे..ना प्रशासनाला. या उद्योगाने तेरखेडा परिसरातील अनेकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले असले तरी अधिकच्या पैशाचा हव्यास कारखानदारांना नडतो आहे. त्यांना साथ मिळते ती भ्रष्ट यंत्रणेची. त्यामुळेच अत्यंत अल्प कालावधीत फुललेला हा उद्योग आता मजुरांच्याच जीवावर उठला आहे. मंगळवारी झालेल्या या स्फोटाने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली. किमान या भीषण दुर्घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का? असाच प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. याबाबत ठोस कारवाईची गरज निर्माण झाली आहे.अर्ध्यातच सुटली भावाची साथ...मंगळवारी तेरखेड्यातील फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात अजय नंदू फरताडे या वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती. त्यामुळे आई-वडील दोघेही मजुरीला जात. आई अपंग असल्याने काम करताना तिला अडचण यायची. मात्र मुलगा व मुलीला उच्च शिक्षण द्यायचे स्वप्न या दोघांनी पाहिले होते आणि ते पूर्ण करण्यासाठीच या माता-पित्याची ही धडपड सुरू होती. अजयही पूर्वीपासून हुशार म्हणूनच ओळखला जायचा. अभ्यासासाठी धड पुस्तकेही नसताना त्याने दहावीला ८२ टक्के गुण मिळविले होते. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने कळंब तालुक्यातील आर. आर. पॉलीटेक्नीक येथे यंत्र (मेकॅनिकल) शाखेत प्रवेश मिळविला. नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीतही त्याने प्रयत्न केला होता. त्यात अपयश आले असले तरी चार दिवसापूर्वीच पुण्याच्या बजाज कंपनीचे त्याला कॉललेटर आले होते. दुसरीकडे तंत्रनिकेतनमध्येही त्याची शैक्षणिक आगेकूच सुरू होती. जून महिन्यामध्ये द्वितीय वर्षाचा निकाल लागला. त्यात त्याने ८५ टक्के गुण मिळविले. त्याची बहीणही याच महाविद्यालयात त्याच्याच सोबत शिकत आहे. दररोज ही दोन्ही भावंडे तेरखेड्याहून येरमाळा आणि येरमाळ्याहून हासेगावला शिकण्यासाठी बसने जात असत. शिक्षणासाठीचा खर्च घरच्यांना परवडणारा नाही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी काम करून पैसे मिळवायचे आणि त्यातून तो शिक्षणाचा खर्च भागवायचा. रविवार आणि त्यानंतर आषाढीची सुटी असल्याने तो तीन दिवसासाठी येथे कामासाठी आला होता. मात्र मंगळवारच्या स्फोटात त्याचा दुर्दैवी अंत झाला. अजयचा मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेला. अपंग आई-वडील आणि एकुलती एक बहीण एवढेच आता मागे आहेत. दररोज भावाबरोबर महाविद्यालयात जाणाऱ्या बहिणीचा आक्रोश अनेकांचे काळीज चिरुन जात होता. कारखानदाराकडून नियम धाब्यावर तेरखेड्यातील फटाका कारखानदाराचे मोठे वजन असल्याचे सांगितले जाते. सर्वसामान्यांना हिडीस-फिडीस करणारे अनेक बँकांतील उच्च पदस्थ अधिकारी फटाका कारखानदार बँकेत आला की त्याच्या स्वागतासाठी केबीन सोडून धावतात. मात्र दुर्घटना घडल्यानंतर बहुतांश कारखानदार ना कारखाना स्थळी उपस्थित होते. ना आपद्ग्रस्त मजुरांच्या कुटुंबियाचे सांत्वन करताना दिसले. या कारखानदारांकडून नियम धाब्यावर बसविले जात असल्यानेच असे अपघात होत असल्याचे अनेकांनी सांगितले. अनेक कारखानदारांकडे फटाके निर्मितीसाठीचे परवाने किलो प्रमाणे आहेत. मात्र प्रत्यक्षात तिथे टनावर मालाचा साठा केला जातो. विशेष म्हणजे कारखाना परिसरात मजुरांसाठी कसल्याही सोयी-सुविधा दिसून आल्या नाहीत. आठ बाय आठच्या खुराड्याप्रमाणे असलेल्या खोलीत बिनदिक्कतपणे ही फटाका निर्मिती होते. कारखान्यावर काम करणाऱ्या मजुरांचा विमा उतरविणे बंधनकारक आहे. मात्र अनेक कारखानदार त्याकडे कानाडोळा करीत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. केवळ दाखविण्यासाठी कारखान्यात काम करणाऱ्या घरातील काही सदस्यांचा विमा उतरविला जातो. अशी माहितीही यावेळी तेथे उपस्थित मजुरांनी दिली. विशेष म्हणजे प्रशासनातील संबंधित अधिकारी व कारखानदार यांच्यात अर्थपूर्ण संबंध असल्याने या कारखानदारावर कारवाई कोण? व कशी करणार असा सवाल यावेळी काहींनी उपस्थित केला.पैशाच्या हव्यासामुळे जीव धोक्याततेरखेडा परिसरातील बेरोजगारांना या उद्योगामुळे रोजगार मिळाला असला तरी कारखानदार, प्रशासनातील संबंधित अधिकारी यांच्या पैशाच्या हव्यासामुळे गोर-गरीब मजुरांचा मात्र जीव धोक्यात आला आहे. प्रिन्स फायर वर्क्स या कारखान्यात जिथे स्फोट झाला. त्या कारखान्याच्या अवघ्या काही फूट अंतरावरून १३२ केव्हीची विजेची लाईन गेली आहे. अशा स्थितीत या कारखान्याला परवानगी कोणी दिली आणि तेथे कारखाना आधी असेल तर वीज मंडळाने तेथून लाईन कशी नेली असा प्रश्नही अनेकांनी यावेळी उपस्थित केला. पुरेशा सुविधा आणि संरक्षणाची हमी नसताना मजूरही स्वत:चा जीव धोक्यात घालून अधिकच्या पैशासाठी या कारखान्यावर कामासाठी जातात. १ हजार अॅटमबाँब तयार केल्यानंतर मजुरांना १३० रुपये मिळतात. दिवसभरात साडेतीन ते चार हजार अॅटमबॉम्ब एकजण तयार करू शकतो. यातून पाचशे ते सहाशे रुपयाची दिवसाकाठी कमाई होते. त्यातही हे काम तसे कमी श्रमाचे. त्यामुळे बाहेर दीडशे ते दोनशेच्या मजुरीवर जाण्याऐवजी अनेकजण कारखान्याच्या कामालाच पसंती देतात. दुर्घटना झाल्यानंतर गावातील नेतेमंडळीही फारसा आवाज उठवित नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे नेतेच कारखानदारांना दोन-अडीच टक्के व्याजाने पैसे पुरवितात. त्यामुळे कारखानदाराच्या विरोधात बोलणार कसे? असा हा सगळा साट्या-लोट्याचा मामला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अपघातामुळे घरातील कर्त्या पुरूषांचा मृत्यू होत आहे. याची झळ मात्र आयुष्यभर त्यांच्या कुटुंबियांना सोसावी लागते. पैशासाठी अंत्यसंस्काराला विलंबमहादेव ज्ञानोबा सरवदे (वय ३५) हे मंगळवारच्या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले. मंगळवारी सायंकाळीच त्यांना उपचारासाठी बार्शी येथे हलविण्यात आले. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास उपचार सुरू असताना रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला. निधनाचे वृत्त समजताच कुटुंबियांसह नातेवाईकांवर दुखाचा डोंगर कोसळला. महादेव सरवदे हे पत्नी व चार अल्पवयीन मुलीसह राहत होते. मात्र घरचा कर्ता पुरुष हिरावल्याने हे संपूर्ण कुटुंब पोरके झाले आहे. निधनानंतर मृतदेह आणण्यासाठी नातेवाईक गेले असता, रुग्णालयाने दहा ते बारा हजाराचे बिल त्यांच्या हातावर टेकविले. सरवदे कुटुंबियांकडे एवढी रक्कम त्यावेळी नव्हती. त्यावर रुग्णालय प्रशासनाने अगोदर बिल भरा त्यानंतरच प्रेत ताब्यात देऊ, अशी भूमिका घेतली. त्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत महादेव सरवदे यांचा मृतदेह तेरखेड्यामध्ये पोहोचला नव्हता. शेवटी काही नातेवाईक पैशाची सोय करुन बार्शीला गेले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास सरवदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या एकूणच प्रकाराबाबत सरवदे यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थातूनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. सरवदे यांच्याप्रमाणेच अनेकांची कुटुंबे या दुर्घटनेमुळे उघड्यावर पडली आहेत. त्यांना शासनाकडून ठोस मदत देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
तेरखेड्यात कारखाने मृत्यूचेच
By admin | Updated: July 10, 2014 01:00 IST