कळंब : मोबाईल टॉवरच्या केबलची चोरी करून पळ काढणाऱ्या चोरट्यांच्या दुचाकीची शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्याच्या सायकलला धडक बसली़ अपघातानंतर शेतकऱ्याने हातात दगड घेऊन मारण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी मुद्देमाल तेथेच सोडून पळ काढला़ ही घटना रविवारी पहाटे ईटकूर गावच्या शिवारात घडली़याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ईटकूर येथे एका खासगी कंपनीचे टॉवर असून, त्यावरून परिसरातील मोबाईलधारकांना सेवा पुरविली जाते़ चोरट्यांनी रविवारी पहाटेच्या सुमारास या टॉवरवरील आॅप्टिकल फायबरच्या केबलची चोरी केली़ चोरलेले वायर घेवून हे चोरटे दुचाकीवरून पसार होत होते़ त्यावेळी ईटकूर येथील शेतकरी बाबासाहेब बापूसाहेब गंभिरे हे पार्डी मार्गावरून शेताकडे चालले होते़ चोरट्यांच्या दुचाकीचा ताबा सुटल्याने ती सायकलवर जावून आदळली़ या अपघातानंतर गंभिरे यांनी हातात दगड घेवून चोरट्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी मुद्देमाल तेथे टाकून पळ काढला़ याबाबत कळंब पोलिसांशी संपर्क साधला असता, याबाबत कंपनीकडून कोणत्याच प्रकारची तक्रार आली नसल्याचे सांगितले़ दरम्यान, खासगी मोबाईल कंपनीच्या टॉवरवरील बॅटऱ्या, केबल चोरीचे प्रकार वाढले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)
चोरीचा मुद्देमाल टाकून चोरटे पसार
By admin | Updated: June 30, 2014 00:42 IST