औरंगाबाद : ‘भारतीय सायन्स काँग्रेस’च्या धर्तीवर औरंगाबादेत जानेवारी महिन्यामध्ये ‘महाराष्ट्र सायन्स काँग्रेस’चे आयोजन केले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यासंदर्भात ‘भारतीय सायन्स काँग्रेस’चे अध्यक्ष तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठात आढावा घेण्यात आला. डॉ. निमसे यांच्या पुढाकाराने ३ ते ७ जानेवारीदरम्यान मुंबई विद्यापीठात १०२ वी भारतीय सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यातील विद्यापीठांना या काँग्रेसमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. या अनुषंगाने डॉ. निमसे यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, कुलसचिव डॉ. धनराज माने, डॉ. कारभारी काळे, सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन्सचे संचालक डॉ. यशवंत खिल्लारे, ‘आय क्वॅक’चे संचालक डॉ. वि.ल. धारूरकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रत्नदीप देशमुख यांच्यासह रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अंजली राजभोज, डॉ. एम.डी. सिरसाट, डॉ. महादेव मुळे, डॉ. सूर्यभान सनान्से, डॉ. सुनीती बर्वे, डॉ. एम.एम. फावडे, डॉ. एम.बी. ढाकणे, डॉ. प्रवीण वक्ते, डॉ. अनिल घुले, डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. देवानंद शिंदे, डॉ. जी.आर. मंझा आदी उपस्थित होते. औरंगाबादेत होणाऱ्या या परिषदेत महाराष्ट्रातील विद्यार्थी व सर्वसामान्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या हेतूने नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांना निमंत्रित करण्याचा मानस कुलगुरू डॉ. चोपडे यांनी व्यक्त केला. परिषदेसाठी लागणारा खर्च उभा करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जातील, असा विश्वास कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईअगोदर औरंगाबादसाठी प्रयत्न यासंदर्भात डॉ. एस.बी. निमसे म्हणाले की, जगात जे जे चांगले आहे त्याचा लाभ मराठवाड्यातील विद्यार्थी व संशोधकांना व्हावा, यासाठी मुंबई येथे होणाऱ्या सायन्स काँग्रेसच्या आधी औरंगाबादेत महाराष्ट्र सायन्स काँग्रेस व्हावी, असे प्रयत्न आहेत. सायन्स काँग्रेसला येणारे काही स्कॉलर औरंगाबादेत आणावेत, तसेच सायन्स काँग्रेसमधील काही महत्त्वाचे कार्यक्रम, व्याख्याने टेलिकास्ट करून औरंगाबादेत दाखवावेत, असा विचार आहे.
विद्यापीठात होणार कार्यक्रम
By admin | Updated: August 1, 2014 01:07 IST