औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्याचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असून, दिल्लीस्थित डीएमआयसी कार्यालयाने प्रकल्पाचे प्लॅनिंग आणि विविध कामांसाठी एजन्सी नेमण्याचे काम सुरू केले आहे. डीएमआयसी प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूकदार मोठ्या संख्येने येतील. स्थानिक अडीच लाखांहून अधिक बेरोजगारांना रोजगाराची संधीही उपलब्ध होईल.केंद्र आणि राज्य शासनातर्फे दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या कामावर विशेष भर देण्यात येत आहे. स्वप्नवत वाटावा असा हा प्रकल्प औरंगाबादेत अक्षरश: ओढून आणण्यासाठी आ. राजेंद्र दर्डा यांनी बरेच परिश्रम घेतले. शहराच्या औद्योगिकीकरणाला बरीच गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. डीएमआयसी प्रकल्पाचे संपूर्ण काम दिल्ली कार्यालयातूनच सुरू आहे. प्रकल्पाचा व्याप सहा राज्यांमध्ये असून, काही ठिकाणी प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाली आहे. औरंगाबादेत करमाड येथे लॉजिस्टिक सेंटर उभारण्यासाठी कन्सल्टंट नेमणे आदी कामे सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.कॉरिडॉरमधील शेंद्रा- बिडकीन या मेगा सिटीच्या उभारणीस लवकरच सुरुवात होणार आहे. संपूर्ण कॉरिडॉर (डीएमआयसी) मध्ये ९० अब्ज डॉलर (सुमारे ४८ लाख कोटी रुपये) खर्च अपेक्षित असून, केंद्र शासनाचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामध्ये ७ नवीन शहरे वसविण्याची योजना आहे. त्यात शेंद्रा- बिडकीनचा समावेश आहे.मेगा सिटी १० हजारांहून अधिक हेक्टरवर विकसित करण्यात येणार असून, प्रकल्पाची तीन टप्प्यांत उभारणी होणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ३ लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. करमाड, लाडगाव, बिडकीन येथील सुमारे १ हजार हेक्टर जमीन आतापर्यंत ताब्यात घेण्यात आली असून, आणखी नऊ हजार हेक्टर जमीन ताब्यात घेणे बाकी आहे. दरम्यान, डीएमआयसीच्या स्मार्ट सिटीच्या मास्टर प्लॅनचे काम हाँगकाँग येथील कंपनीकडून सुरू आहे.कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यात एक्झिबिशन हॉल, रेल्वे यार्ड आणि लॉजिस्टिक पार्कचे काम युद्धपातळीवर कसे सुरू करता येईल, यासंबंधीचे प्रयत्नही सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्पडीएमआयसी प्रकल्पात येऊ घातलेले उद्योग हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार आहेत. या उद्योगांतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निर्यातक्षम वस्तूंची निर्मिती होईल. त्यामुळे येथे तांत्रिक, अतांत्रिकी, कुशल व अकुशल असा साधारणपणे तीन लाख सरळ रोजगार निर्माण होणार आहे. 2शेंद्रा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटरही उभारले जाणार आहे. ६० हजार चौरस फुटांची ही इमारत असेल. त्यासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्यात येतील.3डीएमआयसीअंतर्गत शेंद्र्यात साडेदहा हजार हेक्टरवर उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहतीतील सुमारे साडेसहाशे हेक्टर क्षेत्राचा वापर नागरी व पायाभूत सुविधांसाठी करण्यात येणार आहे. डीएमआयसीच्या पहिल्या टप्प्यात २,३५० हेक्टर क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २,३२० अब्ज रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.डीएमआयसी प्रकल्पामुळे औरंगाबादबरोबरच मराठवाड्याचाही औद्योगिक विकास साधला जाणार आहे. डीएमआयसीमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग येथे येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. - राजेंद्र दर्डा, आमदार
अडीच लाख तरुणांना रोजगार!
By admin | Updated: October 3, 2014 00:38 IST