गजानन वानखडे , जालनाशहरातील संत रामदास, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहात २४ दिवसांपासून वीज गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. वीज, पाणी, स्वच्छता, गरम पाणी, पुस्तके या सेवा नावालाच असल्याचा प्रकार वसतिगृहाला भेट दिल्यानंतर लक्षात आला. समाजकल्याण विभागाच्या या गलथान कारभारामुळे दोन्ही वसतिगृहातील १५० विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. समाजकल्याण विभागाअंतर्गत जिल्हात मुलींचे तीनन आणि मुलांचे ६ असे ९ वसतीगृहे आहेत. या सर्वच वसतिगृहाची स्थिती कमीअधिक प्रमाणात अशीच आहे. शहरातील संत रामदास, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहाला गुरुवारी प्रत्यक्ष भेट दिली असता तेथील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. २४ दिवसांपासून वीज नसल्याने विद्यार्थी अंधारातच जगत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. त्यातच वीज, पाणी, स्वच्छता, गरम पाणी, पुस्तके या सुविधांच्या बाबतीतही आनंदी आनंद आहे. दोन्ही वसतिगृहाची स्वच्छता करण्यासाठी मुंबईच्या आणि पुण्याच्या दोन कपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. परंतु, दोन्ही वसतिगृहात स्वच्छता नावालाही दिसत नाही. तुटलेले बाधरूम, नळाची दुरावस्था, तुटलेल्या खिडक्या, गळकी इमारत, गळक्या पाण्याच्या टाक्या, प्लास्टर पडलेले छत अशा अनेक समस्या वसतिगृहात जागोजागी भेटतात. बजेट नसल्याची अडचन सांगुन समाजकल्याण विभागाने आपले हात वर केले. पण, या विद्यार्थ्यांनी जगायचे कसे, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. गेल्या वर्षी वसतिगृहाच्या दुरूस्तीसाठी आलेले ५७ लाख रूपये खर्च करण्यात आले. परंतु अद्यापही समस्या तशाच असल्याने केलेल्या खर्चावरही विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उभे कले आहे.आमच्याकडे पैसेच नसल्यामुळे ही अडचण निर्माण झाली असल्याचे समाजल्याण विभागाचे सहायक आयुक्त बी. एन. वीर यांनी सांगितले.या वसतिगृहांची समस्या ‘लोकमत’ने राज्याचे आयुक्त रणजितसिंह देओल यांच्याकडे दूरध्वनीद्वारे मांडली. राज्य शासनाने पैसे कोषागाराकडे पाठविले आहेत. मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी पुढे समाजकल्याण विभागाला ते वर्ग केले नाहीत. शुक्रवारपर्यंत वीज सुरु करा असे आदेश मी दिले असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवारी रात्री ८ वाजेदरम्यान त्यांच्याशी बोलणे झाले. सव्वा नऊ वाजता दोन्ही वसतिगृहात अचानक वीज सुरू करण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी फोनवरुन ‘लोकमत’ला दिली. बाकीच्या समस्या मात्र आहे तिथेच होत्या.संदीप वाघमारे : गेले २४ दिवस आम्ही अंधारात काढले. त्यामुळे ऐन परिक्षेच्या काळात आमचा अभ्यास कमी पडला. वीज, पिण्याचे पाणी नसल्याने मोठी पंचाईत झाली आहे. बुधवारपासून वसतिगृहात पिण्याचे पाणी आले. परंतु पिण्याचे पाणी आणि आंघोळीच्या पाण्यासाठी एकच टाकी आहे. ती पण गळत असल्याने आलेले पाणी वाया जात आहे.समाजकल्याण विभाग, गृहपाल यांना वारंवार निवेदने दिली, परंतु काहीच फरक पडला नाही.
दोन वसतिगृहांची वीज २४ दिवसांपासून गायब
By admin | Updated: January 16, 2015 01:07 IST