जालना : शहरात नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून येथील मुख्य उत्सव समजल्या जाणाऱ्या दुर्गामाता मंदिर परिसरात आठ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिराच्या आवारात कुठलेही स्टॉल लावण्यास मज्जाव करण्यात आल्याचे संस्थानच्या विश्वस्तांकडून सांगण्यात आले.शहरातील मोठा नवरात्रोत्सव येथे साजरा करतात. त्याचप्रमाणे मोठी यात्राही याच मंदिर परिसरात भरते. नवरात्र काळात नऊ दिवस अनेक भाविक पहाटेपासून घरातून पायी दर्शनासाठी निघतात. या मंदिराचे विश्वस्त तथा पुजारी रमेशचंद्र भिकुलाल यांनी सांगितले की, दुर्गामाता मंदिर प्राचीन असून पूर्वीपासून येथे नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे अभिषेक, काकडा आरती, दुर्गासप्तशती, अन्नदान, सायंकाळी देवीची आरती व महापूजा होणार आहे. मंदिर परिसरात भाविकांना महिला व पुरूष अशा स्वतंत्र रांगेने दर्शन घेता यावे, यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या मंदिरात दर्शनासाठी दूर अंतरावरील भाविक येतात. नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून दुतर्फा खडी व मुरूमाच्या साह्याने तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला आहे. मंदिर व यात्रा परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून त्यासाठी काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)जुना जालन्यातील काळुंका माता मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी या ठिकाणीही अंतिम टप्प्यात आली आहे. नवरात्रनिमित्त या मंदिर परिसरातही दूर अंतरावरून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. हे मंदिर जुने असून मागील काही वर्षांमध्ये मंदिर परिसराचा विकास करण्यात आला आहे. ४जुना जालन्यातील अमृतेश्वर महादेव मंदिरात नवरात्र महोत्सवाची तयारी करण्यात येत आहे. भगवतीस महाअभिषेक, सप्तशती पाठ इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सेवानिवृत्त तहसीलदार पी.एस. कल्याणकर व विश्वस्त देवीदास वाघमारे यांनी दिली.
दुर्गामाता मंदिर परिसरात आठ सीसीटिव्ही कॅमेरे
By admin | Updated: September 23, 2014 01:34 IST