वसमत : वसमत नगरपालिकेचा कारभार अनियमित झाल्याने शहरवासियांना दररोज नरकयातना सोसाव्या लागत आहेत. स्वच्छतेचा विभागीय पुरस्कार पटकावलेल्या या शहरातील भर बाजारपेठेच्या रस्त्यावरून दररोज गटारगंगा वाहत असून कचर्यांचे ढिगारेही साचत आहेत. या प्रकाराने नागरिक त्रस्त झाले असून हतबल अवस्थेत जागेवरच सत्ताधार्यांच्या नावाने खडे फोडत असल्याचे चित्र आहे. वसमत शहरात नगर पालिकेचे अस्तित्व आहे की नाही? हा प्रश्न पडावा अशी अवस्था झाली आहे. शहरात घाणीचे एवढे साम्राज्य पसरले आहे की, स्वच्छतेचा विभागीय पुरस्कार वसमत न.प.ला कोणत्या निकषांआधारे देण्यात आला? असा सवाल आता प्रत्येकजण विचारत आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेतील नाल्या तुंबलेल्या आहेत. महिनोगणती नालेसफाई होत नाही. परिणामी दररोज सकाळी झेंडा चौकातील नाल्यांचे पाणी मुख्य रस्त्यांवरून वाहते. गटाराचे पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने दुर्गंधीयुक्त वातावरण तयार होते. झेंडा चौक - सत्याग्रह चौक, सत्याग्रह चौक - सत्यनारायण टॉकीज हा रस्ता तर दररोज गटार गंगेसाठीच असावा, अशी परिस्थिती आहे. सकाळी या रत्यावरून पायी चालणेही अवघड असते. गटारातील पाण्याचा प्रवाह कमी झाला की आपोआपच रस्त्यांवरून पाणी वाहणे थांबते व पुन्हा दुसर्या दिवशी तोच प्रकार नित्यनेमाने घडत असतो. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा हा प्रभाग आहे, हे विशेष. भर बाजारपेठेतून दररोज वाहणार्या गटारगंगेमुळे व्यापारी, नागरिक त्रस्त आहेत. मात्र नगरपालिका प्रशासन व पदाधिकारी मात्र याकडे पाहण्यासही तयार नाहीत. कापड बाजारातील सरस्वती मंदिराजवळ मुख्य रस्त्यावरच उकिरडा बनवण्याची पद्धत सुरू झाली आहे. कधीकाळी मोठा गाजावाजा करून खरेदी केलेल्या घंटागाड्या व अॅपे आता गायब झाल्याने रस्त्यावर साचलेला कचरा आठ-आठ दिवस उचलला जात नाही. व्यापारी नगरसेवकांचेही नगर पालिकेत कोणी ऐकत नसल्याने ते हतबल झाल्याचे चित्र आहे. कचराकुंड्या खरेदीची लाखोंची बिले निघत असली तरी शहरात आज एकही कचराकुंडी पहावयास मिळत नाही. घंटागाड्या, अॅपे खरेदीवरही लाखोंचा खर्च झाला; परंतु आज एकही अॅपे व घंटागाडी कचरा उचलण्यास येत नाही. नगरपालिकेने खरेदी केलेले पोकलेन मशिन व स्वच्छता विभागाची वाहने नेमके कोणते काम करतात, हे समजण्यास मार्ग नाही. नगरपालिका शहरात नागरी सुविधा पुरवण्यासाठी असते, याचाच विसर पडला असल्याचे चित्र आहे. फक्त टेंडर काढण्याचे व धनादेशावर स्वाक्षर्या करून टक्केवारीचा हिशोब लावण्यासाठीच नगरपालिका कार्यरत असल्याचे सध्याचे चित्र आहे. नगरपालिकेच्या कारभारावर कोणाचे नियंत्रण नाही. नागरिकांची कामे करण्याची कोणाची तयारी नाही. नगरपालिकेत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी कधी पहावयास मिळत नाहीत, अशा परिस्थितीत तक्रार कोणाकडे करावी, या विवंचनेत नागरिक आहेत. विशेष बाब म्हणजे शहराच्या मुख्य बाजारपेठेचा व शहराच्या वरच्या भागातून शिवसेना- भाजपाचेच सदस्य निवडून गेलेले आहेत. सेना- भाजपाच्याच ताब्यात नगरपालिका आहे व याच भागात सर्वाधिक अस्वच्छता आहे. सत्ताधार्यांच्या प्रभागात जर एवढी बकाल अवस्था असेल तर विरोधी पक्षांच्या प्रभागात काय अवस्था असेल? याची कल्पना न केलेलीच बरी. सत्ताधार्यांना नागरिकांच्या गैरसोयीचे व नागरी सुविधा पुरविण्याच्या कामाचे सोयरसुतक नाही, विरोधक निष्प्रभ ठरत आहेत. राजकीय पदाधिकारी व संघटनाना सामाजिक प्रश्नांची जाण नाही, नागरिक व व्यापारी वर्गास जाब विचारण्याची हिम्मत राहिली नाही. अशा परिस्थितीत शहराचा बकालपणा दिवसेंदिवस वाढत आहे व घाणीचा विळखा शहराभोवती वाढत आहे. रोगराई पसरण्याचा धोकाही वाढत आहे. नगरपालिकेचा अनियंत्रीत कारभारावर नियंत्रण कोण ठेवणार? हाच प्रश्न कायम असल्याने वसमतमध्ये दुर्गंधीचे साम्राज्यही कायम आहे. (वार्ताहर) घंटागाड्या गायब मोठा गाजावाजा करून नगर पालिकेने खरेदी केलेल्या घंटागाड्या व अॅपे आता गायब झाल्याने रस्त्यावर साचलेला कचरा आठ-आठ दिवस उचलला जात नाही. कचरा कुंड्या खरेदीची लाखोंची बिले निघत असली तरी वसमत शहरात आज एकही कचराकुंडी पहावयास मिळत नाही. नगरपालिकेच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण नाही आणि नागरिकांची कामे करण्याची कोणाची तयारी नाही. प्रशासनानेच वसमतवासियांच्या समस्यांकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
वसमत घाणीच्या विळख्यात
By admin | Updated: May 30, 2014 00:34 IST