उस्मानाबाद : शहरातील निरामय हॉस्पिटलमधील ‘आयसीयू’ विभागात वॉर्डबॉय म्हणून काम करणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला़ ही घटना शुक्रवारी सकाळी समोर आली असून, नातेवाईकांनी गुन्हा नोंदविण्याची मागणी लावून धरली होती़ मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुना बसडेपो भागात राहणारा सुरेश लक्ष्मण साळुंके (वय-२४) हा युवक निरामय हॉस्पिटलमधील आयसीयू विभागात वॉर्डबॉय म्हणून काम करीत होता़ तो गुरूवारी सायंकाळी काम संपल्यानंतर घरी आला नसल्याने त्याच्या वडिलांनी रूग्णालय गाठून विचारपूस केली होती़ त्यावेळी तो घरी गेल्याचे सांगितले होते़ मात्र, तो रात्रीही घरी न आल्याने त्यांनी शुक्रवारी सकाळी पुन्हा रूग्णालय गाठून विचारपूस केली़ त्यावेळी रूग्णालयात पाहणी केली असता जिन्याजवळील अडगळीच्या ठिकाणी सुरेश साळुंके याचा मृतदेह आढळून आला़ ही घटना कळताच नातेवाईकांनी दवाखान्यात धाव घेवून एकच गोंधळ सुरू केला होता़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मयताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवून दिले़ जिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी झाली होती़ याबाबत डॉ़ राघवेंद्र डंबळ यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल शहाणे हे करीत आहेत़ दरम्यान, युवकाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, नातेवाईकांमधून मात्र, या घटनेवरून तर्कवितर्क लावले जात होते. (प्रतिनिधी) वॉर्डबॉयच्या मृत्यू प्रकरणी निरामय क्रिटीकल केअर सेंटरच्या वतीने प्रसिध्दीपत्रक काढण्यात आले आहे़ चांगल्या कर्मचारी असलेल्या सुरेश साळुंके याच्या मृत्यूमुळे रूग्णालय प्रशासनाला धक्का बसल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे़ शिवाय पोलिसांना आवश्यक ती माहिती दिली असून, यापुढील काळातही तपासकामी रूग्णालातील अधिकारी, कर्मचारी संपूर्ण सहकार्य करून तपासासाठी लागणारी सर्वती माहिती देऊन सहकार्य करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे़आत्महत्येचा कयास४मयत सुरेश साळुंके याच्या डाव्या हातावर इंजेक्शनच्या खूणा आढळल्या असून, त्याच्याजवळ औषधाची एक बाटलीही सापडली आहे़ मयताचा व्हिसेरा पुढील चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे़ प्राथमिकदृष्ट्या सुरेश साळुंके याने आत्महत्या केल्याचा कयास पोलिसांनी वर्तविला असून, याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच बऱ्याच बाबी स्पष्ट होतील, असेही पोलीस सूत्रांनी सांगितले़
‘वॉर्ड बॉय’चा संशयास्पद मृत्यू
By admin | Updated: March 28, 2015 00:45 IST