औरंगाबाद : सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेद्वारे आयुर्वेदिक डॉक्टरांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. ‘मिक्सोपॅथी’च्या या निर्णयाविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) डॉक्टरांनी मंगळवारी समर्थनगर येथील आयएमए कार्यालयात लाक्षणिक उपोषण करीत निषेध नोंदविला.
उपोषणात ‘आयएमए’चे उपाध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर, वूमन डॉक्टर विंगच्या अध्यक्षा डॉ. उज्ज्वला दहिफळे, माजी अध्यक्ष डॉ. दत्ता कदम, डॉ. कुलदीपसिंह राऊळ, डॉ. रमेश रोहिवाल, सहसचिव डॉ. सचिन सावजी, डॉ. प्रफुल्ल जटाळे, डॉ. राजेंद्र शेवाळे, डॉ. ईश्वरचंद्र नागरे, डॉ. कुरम खान, डॉ. अनंत कडेठाणकर, डॉ. सोनवतीकर, डॉ. खंडागळे आदी डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘आयएमए’तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर आणि सचिव डॉ. यशवंत गाडे यांनी राष्ट्रीय आंदोलनात दिल्लीत सहभाग नोंदवत तेथे उपोषण केले.
जनतेच्या हितासाठी आंदोलन
डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. दत्ता कदम आणि डॉ. कुलदीपसिंह राऊळ यांनी भूमिका विशद केली. आमचा आयुर्वेदाला विरोध नाही; पण दोन पॅथीच्या एकत्रीकरणला विरोध आहे. आज रुग्णाला आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी, अशा वेगळ्या डॉक्टरांची निवड करण्याची मुभा आहे; परंतु या नवीन उपचार पद्धतीमुळे हा अधिकार त्याच्याकडून हिरावला जाईल. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी हे आंदोलन आहे, असे ते म्हणाले.
फोटो ओळ...
लाक्षणिक उपोषणात सहभागी इंडियन मेडिकल असोसिएसनचे (आयएमए) पदाधिकारी आणि डॉक्टर्स.