उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील, तालुक्यातील नव्हे जिल्ह्याच्या विविध कानाकोपऱ्यातून रूग्ण उपचारासाठी येतात़ रूग्णांची सोय व्हावी यासाठी जिल्हा रूग्णालयातील ओपीडी सकाळी ८़३० ते दुपारी १२़३० व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत चालू ठेवण्यात येते़ मात्र, या ओपीडीच्या काळातच अनेक तज्ञ डॉक्टर मंडळी गायब असल्याच्या तक्रारी वेळोवेळी होतात़ विशेषत: सकाळच्या ‘ओपीडी’पेक्षा दुपारच्या ओपीडीच्यावेळी डॉक्टर गायब होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते़ जिल्हा रूग्णालयातील ‘ओपीडी’च्या वेळेत शुक्रवारी दुपारी ‘स्टिंग आॅपरेशन’ केले असता हा प्रकार प्रकर्षाने जाणवला़ दुपारची ओपडी ४ वाजता सुरू होत असल्याने शहरासह जिल्ह्यातील अनेक रूग्ण व त्यांचे नातेवाईक ३़३० ते ३़४५ वाजल्यापासूनच जिल्हा रूग्णालयात दाखल होण्यास सुरूवात होते़ विविध आजारांनी ग्रासलेले रूग्ण डॉक्टरांची वाट पाहत विविध विभागासमोर थांबले होते़ ओपीडीतील अस्थीरोग व युनानी कक्षाच्याा बाहेर अशीच रांग लागली होती़ सायंकाळचे ५ वाजले तरी संबंधित डॉक्टर त्यांच्या कक्षात हजर झालेले नव्हते़ त्यामुळे कोण २० मिनिटांपासून तर कोण एक तासापासून त्यांची वाट पाहत कक्षाबाहेरच थांबल्याचे दिसून आले़ पहिल्या मजल्यावरील बालरोग विभागाची पाहणी केली असता तेथेही ४़४५ पर्यंत डॉक्टर आले नव्हते़ त्यानंतर संबंधित डॉक्टरांनी हजेरी लावून उपचार सुरू केले़ इतर विभागातील काही डॉक्टर नियमित वेळेपेक्षा २० ते ३० मिनिटे उशिराने आल्याची तक्रार नागरिकांनी केली़ तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत अस्थिरोग, युनानी विभागातील डॉक्टर त्यांच्या कक्षात आले नव्हते़ त्यांची वाट पाहत कक्षाबाहेर १५ ते २० रूग्ण व त्यांचे नातेवाईक थांबल्याचे दिसून आले़ तज्ञ नसल्याने रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ रूग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून केलेले नियोजन कागदावर राहत आहे़ त्यामुळे या प्रकाराकडे लक्ष देवून ‘ओपीडी’च्या वेळेत डॉक्टरांनी त्यांच्या कक्षात थांबावे, यासाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे़ दरम्यान, याबाबत डॉ़ एकनाथ माले यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला केला असता होवू शकला नाही़ (प्रतिनिधी)
डॉक्टरांची बेफिकीरी; रूग्णांना वेदना !
By admin | Updated: August 20, 2016 00:50 IST