औरंगाबाद : साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात करा व कळसा हे मातीचे छोटे माठ विक्रीला आले आहेत. मात्र, करा खरेदी करायचा की कळसा, यात अनेकांचा गोंधळ उडतो.
अक्षय तृतीया शुक्रवारी (दि. १४) आहे. आपल्या पितरांना वर्षभर पाणी पिण्यास मिळावे आणि त्यांनी तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद द्यावा, ही संकल्पना धर्मशास्त्राने केली आहे.
पुनर्जन्म मानत असल्याने ज्या ज्या व्यक्तीचे निधन झाले, ते कोणत्या ना कोणत्या रूपात जन्माला येत असतात. कोणी पशु-पक्षी म्हणून जन्माला येत असतो. त्यांना उन्हाळ्यात पाणी मिळावे, त्यांचे हाल होऊ नयेत, या हेतूने करा, कळसा दान देण्याची प्रथा पडली आहे. त्यासोबत गहू, आंबे सुद्धा दान देतात. अनेक जण घराच्या गच्चीवर पक्ष्यांसाठी करा किंवा कळसामध्ये पाणी भरून ठेवतात, पक्ष्यांना खाण्यासाठी गहू, आंबे ठेवत असतात.
मात्र, आजही लोकांमध्ये संभ्रम आहे की, कोणी करा खरेदी करावा व कोणी कळसा खरेदी करावा. सुरेश केदारे गुरुजी यांनी सांगितले की, ज्यांची आई हयात आहे, पण वडिलांचे निधन झाले, त्यांनी कळसा ( मोठ्या आकारातील माठ) खरेदी करावा व ज्यांचे वडील हयात आहेत, पण आईचे निधन झाले, त्यांनी करा ( छोट्या आकारातील माठ) खरेदी करावा. तसेच ज्यांच्या आईचे व वडिलांचे निधन झाले आहे, त्यांनी करा व कळसा दोन्ही खरेदी करावे.
चौकट
अक्षय तृतीयेच्या दिवशी कधी करावी पूजा
करा व कळसाची पूजा सूर्योदयापासून ते दुपारी २ वाजेदरम्यान करावी. त्यासोबत गहू, आंबे दान द्यावेत किंवा गच्चीवर पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवावे.