नांदेड : तापमानातील बदलामुळे जिल्ह्यात विषाणूजन्य आजारात वाढ झाली आहे़ तापाची साथ असली तरी डेंग्यू, मलेरियाची साथ नसल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ़ बी़एम़ शिंदे यांनी स्पष्ट केले़जिल्ह्यात ताप, खोकला, सर्दी अशा विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे़ या वाढलेल्या रूग्णांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शिंदे यांनी ‘स्काईप’ च्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरंन्सीगद्वारे संवाद साधला़ जिल्ह्यातील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या़ यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाही मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले आहेत़ आरोग्य पथकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील डासांच्या घनतेचे प्रमाण घेतले जाते़ यातून तापासह अन्य आजारांवर प्रतिबंधक उपाययोजना केल्या जातात़ प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये कोरडा दिवस पाळणे, जनजागृती करणे, डासांचे प्रमाण कमी करणे आदींचा समावेश आहे़ शेजारील हिंगोली जिल्ह्यात डेंग्यूने काही रूग्ण दगावले असले तरी डेंग्यूने कुणाचाही मृत्यू झाला नाही़ जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियाचे रूग्ण असले तरी या रोगांची साथ नाही़ विशेष जिल्ह्यात डेंग्यू रूग्णांचे प्रमाण हे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात अधिक असल्याची बाबही पुढे आली आहे़ विषाणूजन्य आजारांपासून बचावासाठी वेळेत औषधी घेणे हाच उपाय आहे़दरम्यान, उद्या २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे़ या बैठकीत साथरोगांना आळा घालण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर चर्चा होणार असल्याचे डॉ़ शिंदे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यात विषाणूजन्य आजार वाढले
By admin | Updated: September 24, 2014 00:17 IST