जालना : ग्रामीण भागात गावातच नागरिकांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळावीत, यासाठी केंद्र सरकारच्या ई-डिस्ट्रीक्ट या संगणक प्रणालीचा वापर करून महा-ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात चार हजार प्रमाणपत्रांचे वितरण झाले आहे.पूर्वी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सेतू सुविधा केंद्रातून नागरिकांना रहिवासी, उत्पन्न, राष्ट्रीयत्व इत्यादी प्रकारची प्रमाणपत्रे दिली जात होती.जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात येते. परंतु ही प्रमाणपत्रे आता गावातच मिळू लागल्याने नागरिकांची प्रमाणपत्रांसाठी होणारी धावपळ कमी झाली आहे. प्रमाणपत्रांसाठी शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारूनही नागरिकांना ती वेळेवर मिळतील, याची शाश्वती नव्हती. या महा-ई सेवा केंद्रात नागरिकांकडून अर्ज भरून मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती किंवा आवश्यक ते जोडपत्र घेतले जाते. त्यांना लागणारे प्रमाणपत्र किती दिवसात मिळणार, याची लेखी पावती दिली जाते. केंद्राद्वारे ‘ई-डिस्ट्रीक्ट’ प्रणालीचा वापर करून ही कागदपत्रे स्कॅन केली जातात. ई- मेल पद्धतीने ती संबंधित तहसील कार्यालयाकडे पाठविली जातात. प्रत्येक तहसिलदारांना युजर आयडी दिलेले असून तहसिलदारांच्या डिजीटल स्वाक्षरीचा उपयोग या प्रमाणपत्रांसाठी केला जातो. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जात प्रमाणपत्रे मात्र या पद्धतीने न देता ती कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच दिली जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या शहर व तालुक्याच्या ठिकाणी चकरा थांबल्या आहेत. (प्रतिनिधी)उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके यांना विचारणा केली असता ते म्हणाले, या प्रणालीमुळे नागरिकांचा व प्रशासनाच्या वेळेची बचत होत आहे. आगामी काळात ही सेवा अधिक गतिमान होईल, असा विश्वासही शेळके यांनी व्यक्त केला.
‘ई-डिस्ट्रीक्ट’ मुळे चार हजार प्रमाणपत्रे वितरीत
By admin | Updated: February 11, 2015 00:26 IST