औरंगाबाद : तुरीची आधारभूत किंमत ६ हजार रुपये प्रतिक्विंटल सरकारने जाहीर केली असली तरी शेतकरी मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याला तूर विकून मोकळे होत आहेत.
सरकारने आधारभूत किमतीत तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. मात्र, जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील मार्केट फेडरेशनच्या खरेदी केंद्रात केवळ ३१, गंगापूर २०५, खुलताबाद ५४ अशा २९० शेतकऱ्यांनीच ऑनलाइन नोंदणी केली. वैजापूर, कन्नड, फुलंब्री, सोयगाव येथील खरेदी केंद्रात एकाही शेतकऱ्याने तूर विक्रीसाठी नोंदणी केली नाही.
या उलट जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत्याकडे डिसेंबर व जानेवारी महिन्यात मिळून ३०२७४ क्विंटल तूर शेतकऱ्यांनी विक्री केली. २०१९ च्या डिसेंबर व २०२० च्या जानेवारी महिना मिळून १४३१९ क्विंटल तूर शेतकऱ्यांनी बाजार समितीत विकली होती. यासंदर्भात शेतकरी रामराव सोनटक्के यांनी सांगितले की, कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाला शुक्रवारी ५७०० ते ५८०० रुपये प्रतिक्विंटलदरम्यान भाव मिळाला. दुसऱ्या दिवशी बँक खात्यात पैसे जमा होतात. सरकारी खरेदी केंद्रात अजून नोंदणी सुरू आहे. खरेदी कधी सुरू होईल माहीत नाही. संपूर्ण तूर खरेदी करीत नाही, रक्कमही महिनाभरानंतर मिळते, त्यापेक्षा व्यापाऱ्यांना तूर विकलेली परवडते, यामुळे यंदा सरकारी खरेदी केंद्रात नोंदणीला प्रतिसाद नसल्याचे त्यांनी नमूद केले.
चौकट
तुरीला चेन्नईहून मागणी अधिक
मागील हंगामात भरपूर पाऊस व पोषक वातावरणामुळे मराठवाड्यातील तुरीचा दर्जा चांगला होता. यामुळे जिल्ह्यातून १०० पेक्षा अधिक ट्रक भरून तूर चेन्नईला रवाना झाली. सरकार फक्त एफएक्यू गुणवत्तेची तूर खरेदी करते; पण तूर किती ओलसर असली तरी व्यापारी खरेदी करतो. यंदा ५००० ते ६१५१ रुपयांदरम्यान तूर खरेदी करण्यात आली. आता तुरीचा हंगाम संपत आला आहे. अजून सरकारी खरेदी केंद्र सुरू झाले नाही, सरकारचा दरवर्षी तूर खरेदीत होणारा तोटा यंदा वाचणार आहे.
हरीश पवार, व्यापारी, बाजार समिती