नांदेड : शिवसेनेचे प्रा़ मनोहर धोंडे यांना लोहा-कंधार मतदारसंघातून सेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांनी आता बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे़ शिवा संघटनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची परिषद घेवून त्यांनी आगामी विधानसभेत लिंगायत वीरशैव समाजाची भूमिका ठरविण्यासाठी लेखी मत मागविले असून अपक्ष लढविण्याचे संकेतही दिले आहेत़ येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित शिवा संघटनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या परिषदेत त्यांनी आपली भूमिका विशद केली़ यावेळी प्रा़ धोंडे म्हणाले, राज्यातील ४० मतदारसंघाचा निकाल बदलण्याची ताकद लिंगायत वीरशैव समाजात आहे़ परंतु ८५ लाख लोकसंख्या असलेल्या समाजाची संघटना असलेल्या शिवा संघटनेला राजकीय पक्षाने गृहित धरले आहे़ गेल्या १८ वर्षांपासून त्याचा सातत्याने अनुभव येत आहे़ लिंगायतच्या आरक्षणासाठी शिवा संघटनेच्या माध्यमातून दीर्घकाळ लढा दिला़, परंतु आघाडी शासनाने निवडणुकीच्या तोंडावर त्याचे श्रेय आपल्यालाच मिळावे यासाठी षड्यंत्र रचले़ मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ निवेदन घेवून गेले अन् दुसऱ्या दिवशी आरक्षण मिळाले असे होवू शकते काय? आरक्षण मिळणे एवढे सोपे आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़ शासनाच्या या ढोंगीपणाबद्दल त्यांना न्यायालयात खेचणार असल्याचेही प्रा़ धोंडे म्हणाले़ या निवडणुकीत आम्ही निवडून येवू शकलो नाहीतरी चालेल परंतु पाडण्याचे काम आम्ही नक्की करु शकतो़ राज्यभरातील पदाधिकाऱ्यांकडून लेखी मत घेवून शिवा संघटनेची पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही ते म्हणाले़ चार दिवसांत कुणीही उपटसुंभे यावे अन् पक्षाने त्यांना तिकीट द्यावे हे चालणार नाही अशी टीकाही त्यांनी केली़ त्याचबरोबर लोहा-कंधारमधून अपक्ष म्हणून लढविण्याचे संकेत देत दोन दिवसानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे ते म्हणाले़ तत्पूर्वी भाजपा नेत्या आ़पंकजा मुंडे पालवे व राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भ्रमणध्वनीवरुन उपस्थितांशी संवाद साधला़ यावेळी अभय कल्लावार, उमाकांतअप्पा शेटे, रामचंद्र येईलवाड, संध्या तोडकर, वैजनाथ तोनसुरे यांची उपस्थिती होती़
धोंडे यांची बंडखोरी?
By admin | Updated: September 23, 2014 01:34 IST