औरंगाबाद : शहरातील डेंग्यू व इतर साथरोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मार्ग नाही. त्यामुळे उद्या शुक्रवारी पुण्यातील तीन सदस्य तज्ज्ञांचे पथक शहरात येणार आहे. यामध्ये अॅपडेमोलॉजिस्ट, एन्टोमोलॉजिस्ट, एन्फेक्ट कलेक्टर यांचा समावेश आहे. डेंग्यूसदृश वॉर्डातील डासांचे प्रकार, उगम केंद्र, डासांची घनता हे सदस्य पाहणार आहेत. त्यासाठी ज्या भागात डेंग्यूसदृश आजाराने नागरिकांचा बळी गेला आहे, त्या भागाची पाहणी करून हे सदस्य डासांची माहिती संकलित करतील. त्यानंतर जेथे संशय वाटेल, त्या भागातील नागरिकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार आहेत. डेंग्यूचा डास ४ कि़ मी. अंतरात प्रवास करतो. त्यामुळे डेंग्यू डासांची अंडी व रोगाचा प्रसार वेगाने होतो. याचा आढावा तज्ज्ञांची टीम घेणार आहे. नवीन आयुक्त पी. एम. महाजन यांनी साथरोग नियंत्रणाबाबत आरोग्य विभागाला तातडीच्या सूचना केल्या. डेंग्यूसदृश आजाराने आजवर १० ते ११ जणांचा बळी गेला आहे.
डेंग्यूची साथ : पुण्याचे पथक शहरात
By admin | Updated: September 5, 2014 00:51 IST