जालना : जिल्ह्यात ग्रामीण भागात काही गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाची साथ सुरू असल्याने पाच जणांचा बळी गेला आहे. जानेवारी २०१४ पासून आजपावेतो जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पाठविलेल्या ९० रुग्णांच्या रक्त नमुन्यांमध्ये १३ जण पॉझिटिव्ह आढळले. मात्र या सर्व रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात पद्मावती, कोदोली, पिंपळगाव रेणुकाई, घुंगर्डे हदगाव, मानदेऊळगाव, वाघलखेडा इत्यादी गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाची साथ सुरू आहे. पद्मावतीमध्ये २, पिंपळगाव रेणुकाईत १, घुंगर्डे हदगाव येथे २ जणांचा डेंग्यूसदृश्य तापाने मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आरोग्य विभागाची पथके या भागात पोहोचली. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याचा दावाही पथकांच्या वतीने करण्यात आला. तापाच्या रुग्णांमध्ये शरीरातील प्लेटलेटस् (पांढऱ्या पेशी) कमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र रुग्णांना घाबरून जाऊ नये, व्हायरल फिवरमुळेही प्लेटलेटस् कमी होतात, असे जिल्हा साथरोग नियंत्रण पथकातील डॉ. लांडगे यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये साथरोग परिस्थिती निर्माण झाली, अशा ठिकाणी जिल्हा साथरोग नियंत्रण पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाऊन घरोघर पाण्यात डासअळींचा शोध घेतला. धूरफवारणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. कोदोली येथे पाण्याचे नमुने घेतलेल्या ५० पैकी १० घरांमध्ये डासअळी आढळून आली. (प्रतिनिधी)साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाबरोबरच पंचायत, शिक्षण इत्यादी विभागांनीही जनजागृती, स्वच्छता इत्यादींविषयक काम करावे, या मुद्यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी सभांमध्ये अनेकवेळा चर्चा झाली. डेंग्यूसदृश्य तापासंदर्भात उपाययोजना करताना जनतेने ड्राय डे पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
नऊ महिन्यात आढळले डेंग्यूचे १३ रुग्ण
By admin | Updated: September 23, 2014 01:35 IST