हिंगोली : नैसर्गिक वनसंपदा जतन करण्याबरोबरच कार्यक्षेत्रातील विविध वनस्पती, झाडांपासून वनविभागाला दरवर्षी मोठा महसूल मिळत असतो. यंदा जिल्ह्यातील डिंक मक्त्यांचा लिलाव करण्यात आला असून या माध्यमातून वनविभागाच्या तिजोरीमध्ये साडेपाच लाखांचा महसूल जमा झाला आहे.हिंगोली जिल्ह्याचे वनक्ष्रेत्र कळमनुरी, वसमत, सेनगाव, हिंगोली, औंढा तालुक्यात विभागलेले आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वनक्षेत्रात तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणावर आढळतो. रामेश्वर- कळमनुरी, नागेशवाडी- वसमत हे तेंदूपत्ता संकलन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. यंदा ३ हजार ६०० प्रमाणगोणी तेंदूपत्ता संकलनाचे उद्दिष्ट जिल्हा वनविभागास मिळाले होते. त्यापैकी ३ हजार ५९३ प्रमाणगोणी तेंदूपत्ता जमा करण्यात आला आहे. या माध्यमातूनही दरवर्षी वनविभागाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. या शिवाय डिंक विकत घेण्याचे अधिकार खासगी कंत्राटदारांना विकण्यासाठी डिंक मक्त्यांचा दरवर्षी लिलाव करण्यात येतो. मागील वर्षी हिंगोली जुना या डिंक मक्त्याची लिलावातून बोली रक्कम ५ लाख होती. यंदा हिंगोली जुना हा डिंक मक्ता कैलास सकुसा भुरे यांनी १ लाख २१ हजारास लिलावाद्वारे घेतला आहे. वसमत जुना हा मक्ता प्रतीक सुरेंद्र भुरे यांनी १ लाख ४१ हजारास घेतला असून कळमनुरी जुना हा डिंक मक्ता प्रवीण देवेंद्र पुराहित २ लाख ९१ हजारास मिळाला. डिंक मक्त्याच्या या लिलावातून यंदा हिंगोली वनविभागास ५ लाख ५० हजाराचा महसूल मिळाला आहे. साधारत: एका गावाच्या क्षेत्रात ५० ते ६० किलो डिंक मिळतो. धावडा, बाभळी, तपशी या झाडांची मोठ्या प्रमाणात संख्या असल्याने डिंक संकलन मुबलक प्रमाणात केले जाते. यंदा खूप पाऊस झाल्यामुळे डिंक कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. हिंगोली येथील विभागीय वनअधिकारी कार्यालयात झालेल्या डिंक मक्ता लिलावात १५ मक्तेदारांनी भाग घेतला. यावेळी विभागीय वनधिकारी चंद्रशेखर सरोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी एल.बी. दिवाणे, वनपरिमंडळ अधिकारी जमील अहेमद, लेखापाल राजकुमार घन, लिपिक पी. बी. पोले, दशरथे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
डिंकाच्या महसुलात घट
By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST