औरंगाबाद : घाटी रुग्णालयात एम.आर.आय. करण्यासाठी दाखल झालेल्या सात वर्षांच्या मुलाचा औषधांच्या रिअॅक्शनमुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हे घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. घाटीतील तज्ज्ञांनी मात्र दहा हजारांत एखाद्या रुग्णाला अशा प्रकारे औषधांची रिअॅक्शन येऊन अशी दुर्घटना घडू शकते, असे सांगितले.उमेरखान जाकेरखान (वय ७, रा. रहेमानिया कॉलनी) असे मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. उमेर याला मेंदूविकाराचे झटके येत होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला नियमित गोळ्या सेवन कराव्या लागत.दोन वर्षांपासून त्याला झटके येण्याचे बंद झाले होते. नातेवाईकांनी त्याला समर्थनगरमधील खासगी डॉक्टरांना दाखवले. त्यांनी त्याची एमआरआय तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याचे आई-वडील उमेरला घेऊन घाटीत गेले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना ५ जून रोजीची अपॉइंटमेंट दिली होती. त्यादिवशी ते घाटीत एमआरआयसाठी गेले असता आज रुग्णांची संख्या अधिक असल्याचे सांगून त्यांना २६ जून रोजी येण्याचे सांगितले होते. त्यानुसार उमेरसह त्याचे आई-वडील आज सकाळी नऊ वाजता घाटीत गेले. एमआरआय विभागातील डॉक्टरांनी सकाळी साडेनऊ वाजता त्याला एमआरआयसाठी घेतले. तेव्हा त्याला चार वेगवेगळी इंजेक्शन्स देण्यात आली. यातील काही इंजेक्शन भुलीची होती. एमआरआय करताना रुग्णाने हालचाल करू नये, यासाठी त्यास अशा प्रकारे इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर त्याचे एमआरआय करण्यात आले. एमआरआय सुरू असतानाच त्याला औषधांची रिअॅक्शन झाल्याचे डॉक्टरांना समजले. त्यांनी त्याचे सिटीस्कॅन करून त्याला आयसीयूमध्ये हलविले. तेथे उपचार सुरू असताना हृदय बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास डॉक्टरांनी या घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. हसत खेळत असलेला उमेर इंजेक्शननंतर बेशुद्ध झाला आणि पुन्हा शुद्धीवर आलाच नाही. या घटनेविषयी बोलताना उमेरचे वडील जाकेरखान म्हणाले की, हसत खेळत असलेला आमचा एकुलता एक मुलगा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला. उपचारांना यश आले नाहीएमआरआय क रताना रुग्णाने कोणतीही हालचाल क रू नये, यासाठी त्याला भुलीचे आणि अन्य इंजेक्शन दिले जातात. या इंजेक्शनची रिअॅक्शन दहा हजारांत एखाद्या रुग्णाला होते. त्याप्रमाणे उमेरला रिअॅक्शन झाली. त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार केले, त्यात यश आले नाही -डॉ. वर्षा रोटे, विभागप्रमुख, रेडिओलॉजी विभाग.
औषधांच्या रिअॅक्शनने मुलाचा मृत्यू
By admin | Updated: June 27, 2014 01:03 IST