उस्मानाबाद : नगर परिषदेच्या इतिहासात अशा प्रकारचे हीन दर्जाचे राजकारण यापूर्वी कधीही पहावयास मिळाले नव्हते. विद्यमान नगराध्यक्ष राजेनिंबाळकर हे गटा-तटाचे राजकाण करून पक्षामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संपत डोके यांनी शुक्रवारी केला. अशा या राजकारणामुळे विकास कामाला खिळ बसत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी गुरूवारी प्रसिद्धीपत्रक काढून १२ मार्च रोजी पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करून संपत डोके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीन, असे नमूद केले होते. असे असतानाच आता राष्ट्रवादीचेच सदस्य संपत डोके यांनी शनिवारी तब्बल अडीच पानाचे प्रसिद्धीपत्रक काढून आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतर पक्षश्रेष्ठीसमोर नगराध्यक्षपदी संधी देण्याकरिता लेखी मसुदा तयार करण्यात आला. त्यामुळे त्याचे अनुपालन होणे आवश्यक होते. त्यानुसार आठ महिन्यासाठी हे पद माझ्याकडे सुपूर्द करण्यात यावे, असे ठरले हाते. तेव्हा या पदावर माझा दावा आणि हक्क असतानाही काहीजणांनी श्रेष्ठीवर दबाव आणून मला डावलण्यात आले. श्रेष्ठींच्या आदेशाची पायमल्ली करून राजेनिंबाळकर यांनी अध्यक्षपद स्वत:कडे घेतले, असा आरोप डोके यांनी केला. यांचा कार्यकाळ ११ नोव्हेंबर २०१५ रोजी सरलेला असतानाही स्वत:च्याच मर्जीप्रमाणे कालावधीमध्ये वाढ केली. न्यायालयाच्या आदेशानुसार कुठलाही धोरणात्मक निर्णय घेता येत नसतानाही ते या पदाचा हट्ट का आणि कशासाठी धरताहेत, असा सवाल त्यांनी केला आहे. हा अट्टहास जनतेसाठी नव्हे, तर स्वहितासाठी सुरू आहे, असे सांगत अशा प्रकारे पक्षाला वेठीस धरणारे राजकारण आम्ही कधीही केले नाही अन् करणारही नाही. नगराध्यक्षपद मिळाले नाही तरी चालेल; पण पक्ष आणि माझी कुचंबना कधीही सहण करणार नाही, असे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
पक्षात दरी पाडण्याचा डाव !
By admin | Updated: February 14, 2016 00:06 IST