यशवंत परांडकर, नांदेडशेतकऱ्यांचा सर्वांत आवडता आणि मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण म्हणजे पोळा़ पोळ्याला शेतकरी बैलांना सजवून त्यांची पूजाअर्चा करतो़ मात्र, यावर्षी झालेल्या अल्प पावसामुळे शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात सापडला आहे़ त्यामुळे पोळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी बाजारपेठेत दिसणारी गर्दी यावर्षी पहायला मिळत नाही़ महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भामधील शेतकरी पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात़ बैलांना सजविण्यासाठी रंगीबेरंगी झालर, गोंडे, घुंगुरमाळ, केसाळी, कवड्यांची माळ, वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यातील अलंकार खरेदी केले जातात़ तसेच नवीन कासरे, वेसन बाजारातून खरेदी केली जाते अथवा सूत आणून घरीच तयार केली जाते़ पोळ्याच्या पंधरा दिवस अगोदरपासूनच शेतकरी पोळ्याच्या तयारीला लागत असतो़ यामुळे गावातील वातावरण उत्साहमय असते़ परंतू यावर्षी पावसाच्या खेळीमुळे दुबार - तीबार पेरणी करून कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांमध्ये कोणताच सण साजरा करण्याचे आवसान उरलेले नाही़ त्याचीच परिणिती सध्या गावातील वातावरणावरून दिसत आहे़ पोळा दोन दिवसांवर येवून ठेपला़ बैलांना सजविण्याचे साहित्य आणि शेतीला लागणारी अवजारे बाजारात आली आहेत़ मात्र, सदरील साहित्य खरेदी करणारा ग्राहक असलेला शेतकरी बाजारात पहायला मिळत नाही़ पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांना धुवून त्याला सजविले जाते़ पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य बैलास दिला जातो़ शेती अवजारांची पूजा होते़ यानंतर गावातील मारोती मंदीरापर्यंत सजवलेल्या बैलांची एकत्रित वाजत-गाजत मिरवूणक काढली जाते़ मंदीरासमोर मंगलाअष्टक होतात़ यामुळे गावास यात्रेचे स्वरूप येत असते़ आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी उसणवारी करून हा सण साजरा करीलही.परंतु एका दिवसाच्या उसणवारीने बैलाच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार नाही, हे वास्तव स्विकारून बहुतांश शेतकरी आपल्याकडे असलेले पशुधन विक्रीस काढत असल्याचे चित्र बैल बाजाराहुन लक्षात येते़
बैल पोळ्यावर दुष्काळाची झूल़़
By admin | Updated: August 23, 2014 00:47 IST