भोकरदन : शहरातील ऐतिहासिक असलेल्या लाल गढीचा काही भाग धोकादायक झाल्यामुळे नगर परिषदेच्या वतीने हा भाग उतरविण्यात आला. मात्र तरीही या गढीचा काही भाग कमी करणे आवश्यक असल्याचे मत या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे़पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटने नंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रफीक सय्यद यांनी शहरातील २०० वर्षाची पंरपरा लाभलेली ऐतिहासिक लालगढीच्या मालकांना गढी उतरविण्या संदर्भात नोटीसा दिल्या होत्या. मात्र या नागरिकांनी स्वत: गढी उतरविणे शक्य नाही, असे सांगितले. त्यानंतर या गढीवर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. तेव्हा नागरिकांनी गढी उतरविण्यास सहमती दर्शवली होती. त्या अनुषंगाने नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गढीचा धोकादायक भाग उतरविला आहे. मात्र अद्यापही काही भाग उतरविणे आवश्यक आहे. कारण काही ठिकाणी मध्ये बोगदे पडले असून विटा जीर्ण झाल्याचे दिसत आहे. जर दुदैवाने जास्त पाऊस झाला व गढी कोसळली तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने काळजी घेणे आवश्यक आहे. या गढीच्या बाजूला नागरिक राहतात. तसेच गढी शेजारच्या रस्त्याने नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे गढीवर वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा गढी कोसळल्यास धोका निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे़ या गढीवर अॅड. लक्ष्मीकांत देशपांडे, सुरेशराव देशपांडे, पद्यीमन देशपांडे, दिलीप देशपांडे, संतोष अन्नदाते, अशोक अन्नदाते, नंदकुमार देशपांडे यांच्यासह काही नागरिकांचे वास्तव्य आहे. ही गढी देशपांडे कुटुंबाच्या मालकीची असून दोनशे वर्षापूर्वी त्यांच्या पुर्वजांनी या गढीचे बांधकाम केलेले होते. या गढीच्या बुरूजावर गेले तर राजूर गणपतीचा कळस दिसत होता. शिवाय सिल्लोड शहर तसेच भोकरदन शहराचा सर्व भाग या गढीवरून आज ही बघता येतो मात्र बांधकाम अंत्यत जुने झाले असल्याने व पावसामुळे या बांधकामाच्या वीटा जीर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी या गढीला मध्ये बोगदे पडले आहे. त्यामुळे जास्त धोकादायक असलेला भाग नगर परिषदेच्या वतीने उतरविण्यात आला आहे. मात्र जर पूर्ण गढी उतरावयाची असल्यास त्याचा खर्च कोणी करायचा असा प्रश्न सुध्दा प्रशासनासमोर येणार आहे. कारण ही गढी खाजगी मालकीची आहे. शिवाय गढी पाडण्यास या नागरिकांचा विरोध होणार आहे़या गढीचे एक भागीदार सुरेशराव देशपांडे यांनी सांगितले की, आमच्या पूर्वजांनी गेल्या २०० वर्षा पुर्वी या गढीचे बांधकाम केलेले असून आमची आठवी पिढी या गढीवर वास्तव्य करीत आहे. या गढीचे अर्धे बांधकाम कोरीव दगडाने केलेले असून प्रवेशद्वार कोरीव दगडाने बांधण्यात आले आहे. शिवाय या द्वारावर मोर व लांडोर याचे चित्र कोरलेले आहे. याला एक आख्यायिका आहे. त्यामुळे त्याचे जतन होणे आवश्यक आहे. या गढीचा उर्वरित वरचा भाग हा विटाने बांधण्यात आला आहे. देशपांडे यांनी सांगितले की, माझे ६७ वर्ष वय आहे आतापर्यंत दोन वेळा या गढीची उंची कमी करण्यात आली आहे. सध्या सुध्दा ५० ते ५० फुट गढी आहे गढीचा काही धोकादायक झालेला भाग नगर परिषदेने उतरविला असल्याचे सुरेशराव देशपांडे यांनी सांगितले़ (वार्ताहर)
धोकादायक भाग उतरविला
By admin | Updated: September 5, 2014 00:54 IST