पालम : आॅगस्ट महिना संपत आला तरीही पावसाने हजेरी लावलेली नाही. मागील दोन महिन्यांपासून तग धरलेल्या पिकांनी आता मात्र पाण्याअभावी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पालम तालुक्यातील ४६ हजार हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला आहे. शहरासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या अखेरीस अल्पशा पावसावर पेरणी सुरू केली होती. १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, उडीद यासह विविध पिकांची पेरणी उरकून घेतली. पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांनी बी -बियाणे व रासायनिक खतावर हजारो रुपयांचा खर्च करून खिसा रिकामा केला आहे. परंतु अजूनही पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. उजाडलेला प्रत्येक दिवस कोरडाठाक जात असून कडक उन्हाने शेतकऱ्यांना घायाळ करून सोडले आहे. पालम तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५० हजार ३०७ हेक्टर एवढे आहे. यापैकी ४६ हजार ९४५ हेक्टर जमीन वहितीखाली असून या जमिनीवर खरिपाची पेरणी झालेली आहे. कडधान्य पिकाची ६ हजार ३५० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. तर तृणधान्य पिकाची २ हजार ८५० हेक्टरवर पेरणी करण्यात आलेली आहे. २५ हजार हेक्टरवर गळीत धान्य तर १२ हजार २०० हेक्टवर नगदी पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केलेली आहे. परंतु अजूनही पाऊस न पडल्याने ४६ हजार हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला असून पिके सुकण्यास सुुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग निसर्गाच्या संकटात सापडला आहे. (वार्ताहर)
पालम तालुक्यात ४६ हजार हेक्टरवरील पिकांना धोका
By admin | Updated: August 17, 2014 00:10 IST