लातूर;
जिल्ह्यात अनधिकृतपणे १६ भागशाळा राजरोसपणे सुरु आहेत़ प्रशासनाने बंदी घालूनही त्या शाळा सुरुच आहेत़ ‘लोकमत’ने भागशाळांचा विषय ऐरणीवर घेतल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून, अनधिकृत भागशाळांच्या १६ मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत़ लातूर जिल्ह्यात २० अनधिकृत भागशाळा बंद करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षण समितीच्या बैठकीत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते़ त्या अंतर्गत या अनधिकृत भागशाळांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या़ तसेच २० अनधिकृत भागशाळा बंद करण्यासंदर्भात सर्वसाधारण सभेतही जोरदार चर्चा झाली होती़ त्यानंतर या भागशाळेवर कारवाईचा भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २० अनधिकृत भागशाळा बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. शाळा बंद न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते़ या नोटिसा बजावताच संस्थाचालकांचे धाबे दणाणले होते़ त्यामुळे काही शिक्षण संस्थांनी सुरु असलेल्या अनधिकृत भागशाळा बंद केल्या़ यामध्ये उदगीर तालुक्यातील श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर, जमहूर ऊर्दू प्राथमिक शाळा उदगीर, मौलाना आझाद ऊर्दू प्राथमिक स्कूल, मोंढा रोड अहमदपूर, सरस्वती प्राथमिक विद्यालय अहमदपूर या चार भागशाळा बंद करण्यात आल्या आहेत़ त्याबाबतचा अहवाल शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे़ या शाळा बंद न केल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करावा़ तसा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयाला विनाविलंब सादर करावा, असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील दहाही गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत़ यामुळे खळबळ उडाली आहे.