भूम : तालुक्यातील पाथरूड नजीक शनिवारी पहाटे अपघात होवून एका इसमाचा मृत्यू झाला होता़ तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत़ यातील अपघातग्रस्त पिकअपमध्ये केम (ताक़रमाळा) शिवारातून चोरून आणलेल्या गायी असल्याचे पोलिसांच्या दक्षतेवरून समोर आले आहे़ दरम्यान, या गायी संबंधित पशुपालकांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे भूम पोलिसांनी सांगितले़पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील पाथरूड - ईट मार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास पिकअप पलटी होवून एकाचा मृत्यू झाला होता़ अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ त्यानंतर पिकअपची पाहणी करतेवेळी आतमध्ये वैरण, जनावराचे शेण आढळून आले़ मात्र, आतमध्ये जनावरे नव्हती़ त्यामुळे पोलिसांना जखमींचा संशय आला़ पोलिसांनी पाथरूड येथील ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांची मदत घेवून परिसरात पाहणी केली़ त्यावेळी बोरीच्या काटेरी झुडपाला दोन गायी व जवळच शेतात एक गाय बांधलेली आढळून आली़ या गायी पोलिसांनी ताब्यात घेवून भूम पोलिस ठाण्यात आणल्या़ याबाबतची माहिती मुख्यालयाला देवून तेथून इतर पोलिस ठाण्यांना कळविण्यात आले़ करमाळा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या केम दूरक्षेत्रांतर्गत गायी चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती़ भूम पोलिसांच्या माहितीवरून करमाळा पोलिसांनी तक्रारदार मोहन कुंडलिक दोंड यांच्यासह भूम पोलिस ठाण्यात धाव घेतली़ सदरील गायी आपल्याच असल्याचे दोंड यांनी पोलिसांना सांगितले़ सर्व खातरजमा झाल्यानंतर या गायी करमाळा पोलिसांच्या ताब्यात दिल्या.(वार्ताहर)
‘त्या’ पिकअपमधील गायी चोरीच्या
By admin | Updated: September 8, 2014 00:54 IST