मारोती जुंबडे । लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाहनांचा परवाना असो की वाहन परवान्याचे नूतनीकरण़ वाहतुकीच्या संदर्भात कोणतेही प्रमाणपत्र हवे असल्यास दलालांच्या माध्यमातून दुप्पट पैसे मोजा आणि त्वरित प्रमाणपत्र मिळवा, असा प्रकार येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात सुरू असल्याची बाब मंगळवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये स्पष्ट झाली आहे़ जिल्हा प्रशासनाला सर्वाधिक महसूल देणारे शासकीय कार्यालय म्हणून उपप्रादेशिक परिहवन अधिकारी कार्यालयाचा क्रमांक वरचा आहे़ वर्षाकाठी लाखो रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाच्या गंगाजळीत हे कार्यालय जमा करते़ मात्र मागील काही वर्षांपासून या कार्यालयाला दलालांचा विळखा पडला आहे़ थेट कर्मचाऱ्यांमार्फत कामे कमी होतात आणि दलालांमार्फतच अधिक उलाढाल होत असल्याची बाबही स्पष्ट होत आहे़ दोन दिवसांपूर्वी परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी खुद्द आपल्या आरटीओ कार्यालयाचे स्टिंग आॅपरेशन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत़ परंतु, ज्या बाबी उघड उघड होतात? त्याचे स्टिंग काय करायचे? असाही सवाल उपस्थित होत आहे़ दरम्यान परिवहन आयुक्तांच्या आदेशानंतर ‘लोकमत’नेच या बाबीची मंगळवारी पडताळणी केली़ येथील प्रशासकीय इमारत परिसरात असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १८ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास या प्रतिनिधीने फेरफटका मारला़ तेव्हा कार्यालयाच्या आवारामध्ये अनेक दलाल फिरत असल्याचे दिसून आले़ काही जणांनी तर चारचाकी गाडीमध्येच आपला कारभार सुरू केल्याचे दिसून आले़ या दलालांचा मागमूस घेत प्रमाणपत्र काढण्यासाठी एका व्यक्तीला दलालांकडे पाठविले़ त्यावेळी कोणतेही प्रमाणपत्र देण्याची तयारी या दलालाने दाखविली़ जे काम थेट आरटीओ कार्यालयातील अधिकारी करू शकत नाहीत, ते काम या माध्यमातून केले जाते़ केवळ पैसे मात्र ठराविक किंमतीपेक्षा अधिक मोजावे लागतात़ हे या पाहणीत दिसून आले़ स्टिंग आॅपरेशनसाठी पाठविलेल्या डमी व्यक्तीने वाहनाचा शिकाऊ परवाना काढण्याची विनंती केली़ तेव्हा शिकाऊ परवान्यासाठी ६०० रुपये लागतील, असे सांगण्यात आले़ प्रत्यक्षात शिकाऊ परवाना केवळ २०० रुपयांमध्ये काढला जातो तर एखाद्याकडे शिकाऊ परवाना आहे आणि त्याला कायमस्वरुपी परवाना हवा असल्यास हे काम देखील १७०० ते १८०० रुपये घेऊन केले जाते़ विशेष म्हणजे शिकाऊ परवाना कायम करण्यासाठी ७५० रुपये एवढीच शासकीय किंमत आहे़ असाच प्रकार बॅच बिल्ला, जड वाहनांचा परवाना काढण्यासाठी देखील होतो़ जड वाहनांचा परवाना काढण्यासाठी शिकाऊपासून ते कायम परवाना मिळेपर्यंत एकदाच पैसे घेतले जातात़ ३ हजार रुपयांपर्यंतचे शुल्क यासाठी आकारले जाते़ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरामध्ये ही दलाल मंडळी कामकाज करते़ दुसरीकडे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातही नागरिकांच्या परवाना काढण्यासाठी मोठ्या रांगा असतात़ परंतु, दररोज रांगेत उभे राहूनही परवाना मिळत नसल्याची बाब समोर आली आहे़ या ना त्या कारणाने रांगेतील व्यक्तीला परत पाठविले जाते़ शेवटी नाईलाजाने दलालांमार्फतच त्याला परवाना काढून घ्यावा लागतो, अशा अनेक तक्रारी यावेळी नागरिकांनी केल्या़ याचाच अर्थ परिवहन कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचारी देखील या वाम प्रकाराला प्रोत्साहन देत असल्याचे आजच्या पाहणी दिसून आले़ दलाल मंडळी नि:संकोचपणे अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये ये-जा करताना व हातामध्ये फाईली घेऊन फिरत असतानाही दिसून आले़ त्यांना हटकण्याची तसदी एकाही अधिकाऱ्याने घेतली नसल्याचेही स्टिंग आॅपरेशन दरम्यान स्पष्ट झाले़
दुप्पट पैसे मोजा, प्रमाणपत्र मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:06 IST