रोकडा सावरगाव : शेतकऱ्यांना यावर्षी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाच्या उत्पन्नात घट होत आहे़ त्यामुळे कापसासाठीचा खर्चही निघतो की नाही? अशी भिती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़या भागातील शेतकरी नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहतात़ त्यामुळे लागवडही मोठ्या प्रमाणात आहे़ यंदा निसर्गाची अवकृपा, अवेळी पाऊस, दुबार, तिबार पेरणीचे संकट तसेच पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ यावर्षी मृग नक्षत्रामध्ये पाऊस न पडल्यामुळे पेरण्यांना दीड ते दोन महिने उशिर झाला़ धूळ पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली़ पावसाने साथ न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेल्या पेरणीचेही उत्पन्न शेतातून निघणे अशक्य झाले आहे़सध्या या भागात पांढरे सोने वेचणीचे काम सुरु झाले आहे़ परंतु, लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उतारा घटला आहे़ तसेच उसावर लोकरी माव्यासारख्या रोग पडला आहे़ त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे़ उताराही निघतो का नाही़ या चिंतेमध्ये कापूस उत्पादक शेतकरी आहेत़ शेतकऱ्यांनी कापसावरील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागडी औषधांची फवारणी केली होती़ परंतु, त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही़ त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे़ (प्रतिनिधी)
कापसाचा उतारा घटला
By admin | Updated: October 3, 2014 00:33 IST