केदारखेडा : परिसरात गेल्या आठ दिवसांपासून कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. परिणामी यंदाही उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. या परिसरात कपाशीची मोठ्या क्षेत्रावर लागवड करण्यात येते. खरिपात कपाशी पेऱ्याचा क्रमांक एक आहे़ त्यानंतर मका, सोयाबीनसह कडधान्याचा समावेश येतो़ या भागात उशिरा का होईना पावसाचे जोरदार आगमन झाले. खरिपात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या व नगदी पीक म्हणून ओळख असणाऱ्या कपाशीची लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली़ त्यात परिसरात उन्हाळी कपाशी लागवडही बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली होती़ मात्र गेल्या आठ दिवसांपूर्वी वातावरणातील बदलामुळे कापसावरील रोगराईत वाढ झाली़ सध्या कपाशीच्या पिकावर मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पाढंरी माशी,कोळी आळी,फुल कीडे आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.शेतकरी विविध महागडी औषधी फवारणी करुन या रोगांचा नायनाट होत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे़ यामुळे कपाशी उत्पादन घटण्याची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे़ या विविध रोगांवर औषध फवारणी करण्याविषयी कृषी खात्याच्या वतीने मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे़ परंतु गावाला असणारे कृषी कर्मचारी गावाकडे फिरकत नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर) या परिसरातील कपाशी पिकावर सायाळ नावाच्या प्राण्याने धुमाकुळ घातला असुन अनेक ठिकाणी अख्खे कपाशीचे शेत फस्त केल्याचे शेतकरी सागंत आहेत.ज्या कपाशीला कैऱ्या आल्या आहेत. शेतात सायाळ नावाचा प्राणी हैदोस घालत असून कपाशीच्या शेतात हा प्राणी आला की़, कपाशी फस्त करीत आहे़बोरगाव तारु,देऊळगाव ताड, चिंचोली, टाकळी,वालसा,जवखेडा ठोंबरे आदी गाव परिसरात या प्राण्यांनी हैदोस घातला आहे़
रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे उत्पादन घटणार
By admin | Updated: September 21, 2014 00:22 IST