परंडा : तालुक्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा कपाशीची लागवड झाली. परंतु, पावसाने दडी मारल्याने हे सर्वच क्षेत्र धोक्यात आले असून, कपाशीवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भावही होऊ लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतरही पावसाने बराच काळ ओढ दिली. यानंतर झालेल्या अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. खरिपातील इतर पिकांसोबतच तालुक्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली. यात लोणी परिमंडळ वगळता जवळा, आनाळा, डोंजा, शेळगाव या परिसरात कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. काही शेतकऱ्यांनी स्पिंकलरद्वारे हे पीक जगविले. मात्र, ज्यांच्याकडे ही सोय नाही, त्यांच्यासमोर पावसाची प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यातच पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे थोड्याफार प्रमाणात उगवलेली पिकेही धोक्यात आली आहेत. सध्याच्या वातावरणाचा कपाशीच्या पिकावर विपरित परिणाम होत आहे. (वार्ताहर)
३५०० हेक्टरवरील कापूस धोक्यात
By admin | Updated: August 11, 2014 01:53 IST