औरंगाबाद : मनोरुग्णांना नियमितपणे तपासणे आणि उपचार मिळणे गरजेचे असते. मात्र, कोरोनाच्या काळात अनेक मनोरुग्णांच्या उपचारात खंड पडला. परिणामी, अनेकांच्या आजाराची तीव्रता वाढीला हातभार लागला. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे घाटीतील मनोविकृतीशास्त्र विभागातील ओपीडीत येणाऱ्या मनोरुग्णांची संख्या वाढली आहे.
गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. याचा फटका मनोरुग्णांना बसला. कोरोनाच्या भीतीने मनोरुग्णांना नियमित उपचारासाठी नेण्याचे टाळण्यात आले, तर उपाचारासाठी नेण्याचे ठरविले, तरी आर्थिक स्थिती, वाहतूक सुविधेचा अभाव, अशा परिस्थितीमुळे रुग्णांना रुग्णांना नेणेही शक्य झाले नाही, शिवाय घाटीतील मनोविकृतीशास्त्र विभागाचा आंतररुग्ण वार्ड बंद करण्यात आला होता. कारण कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. मात्र, मनोविकृतीशास्त्र विभागाचा आंतररुग्ण वार्ड आता सुरू झालेला आहे. उपचारासाठी येणाऱ्या मनोरुग्णांची संख्याही वाढली आहे. ओपीडीत रोज ६० ते ७०च्या घरात रुग्ण येत आहेत.
--
जानेवारीत मनोविकृतीशास्त्र विभागात भरती रुग्ण - ११
उपचार सुरू असलेले रुग्ण-१,१९६
सध्या भरती असलेले रुग्ण-४
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण-१,२००
----
नैराश्याच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक
घाटीतील मनोविकृतीशास्त्र विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात नैराश्याच्या रुग्णांचे सर्वाधिक प्रमाण आहे. उदासीनता, कामात उत्साह नसणे अशी लक्षणे नैराश्याच्या रुग्णांत पहायला मिळत आहे. त्याबरोबरच स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डरचे रुग्ण त्या पाठोपाठ आहेत. आंतररुग्ण विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांत या दोन आजारांचे रुग्ण अधिक आहेत, असे मनोविकृतीशास्त्र विभागाचे डॉ.प्रदीप देशमुख म्हणाले.
---
कोविडचा मनोरुग्णांवर निश्चितच परिणाम झाला आहे. कोरोना काळात कलागुण आणि विकृती अशा दोन्ही बाबी बाहेर आल्या. मनोरुग्णांना औषधोपचार घेता आले नाही. अनेकांनी अर्धीच औषधे घेतली. गेल्या काही दिवसांपासून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या निश्चितच वाढली आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय हे औरंगाबादला होणे आवश्यक आहे, असे वाटते.
-डॉ.प्रसाद देशपांडे, मनोविकृतीशास्त्र विभाग, घाटी