लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन तीन दिवस उलटले आहेत. मात्र बहुतांश शासकीय कार्यालयांतील उद्घाटन व भूमिपूजनाच्या कोनशिला उघड्याच ठेवण्यात आल्या आहेत. हा आचारसंहितेचा भंग असतानादेखील संबंधित कार्यालय प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्षच आहे. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी गेल्या तीन दिवसांपासून निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सक्त निर्देश दिले आहेत. त्यानुसार महसूल कार्यालयातील भूमिपूजन व उद्घाटनाच्या कोनशिला झाकल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवरील पालकमंत्र्यांचा फोटोही काढण्यात आला आहे. मात्र अन्य शासकीय कार्यालयांच्या इमारतींमध्ये असलेल्या कोनशिला उघड्याच आहेत. बार्शी रोडवरील आरोग्य संकुलाचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. या उद्घाटनाची कोनशिला उघडीच आहे. त्यावर आवरण झाकण्यात आले नाही. शिवाय, जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या डाव्या बाजूला इमारत उद्घाटनाची कोनशिला आहे. ही कोनशिलाही झाकण्यात आली नाही. दररोज सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याच प्रवेशद्वारातून कार्यालयात जातात. कार्यालयातून बाहेर पडताना मात्र इमारतीच्या उजव्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वारातून ते बाहेर पडतात. बाहेर पडताना कोनशिला दिसण्याचा प्रश्न येत नाही. परंतु, दुसऱ्या मजल्यावरील स्वत:च्या दालनात जाताना तळमजल्यावर असलेली ही कोनशिला सर्वांनाच दिसते. जिल्हा परिषदेतील बहुतांश खाते प्रमुख ये-जा करण्यासाठी याच प्रवेशद्वाराचा वापर करतात. मात्र त्यांना आदर्श आचारसंहितेबाबत अद्याप माहिती नसावी, हे विशेष ! आचारसंहितेपूर्वी उद्घाटन व भूमिपूजनाचे कार्यक्रम लातूर शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. त्या भूमिपूजन व उद्घाटन कोनशिलाही उघड्याच आहेत. शिवाय, आमदार व खासदार निधीतून जी रस्त्याची कामे झाली आहेत, त्या ठिकाणी फलक आहेत. यातील काही फलकही झाकले नाहीत. एस.टी. महामंडळाच्या एस.टी. बसेसवरही शासनाच्या योजनांची जाहिरात असते. महामंडळाने गेल्या लोकसभेच्या निवडणुकीतील अनुभव पाहता जाहिराती काढून टाकल्या आहेत. परंतु, लातूर शहरातील जिल्हा परिषद, आरोग्य संकुल या कार्यालयांतील कोनशिला जशा उघड्या आहेत, तशा अनेक कार्यालयांत कोनशिला झाकण्यात आल्या नाहीत. हे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले आहे.
आचारसंहितेनंतरही कोनशिला उघड्याच !
By admin | Updated: September 16, 2014 01:32 IST