हिंगोली : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने मघा नक्षत्रापासून गती घेतली. पंधरवड्यापासून सातत्याने पाऊस होत असल्याने हिंगोली वगळता सर्वच तालुक्यांनी दोनशे मिमीचा टप्पा ओलांडला. गतवर्षीपेक्षा दुपटीने पाऊस कमी असला तरी अद्यापही बहुतांश नद्या कोरड्या असून पाणीपातळीत वाढ झालेली नाही. मृग, आर्द्रा कोरड्या गेल्यानंतर पुनर्वसूच्या शेवटच्या टप्प्यात मान्सूनचे आगमन झाले. तोपर्यंत पेरणाला दीड महिन्याचा उशीर झाला. त्यानंतरही पावसात सातत्य नव्हते. पुष्य नक्षत्राच्या अर्ध्यानंतर पाऊस गायब झाला होता. अपेक्षा असतानाही आश्लेषा नक्षत्रातही पावसाचा रूसवा कायम राहिला. पंधरवड्याचा खंड पडल्याने पिकांना बाधा पोहोचली. वाढ खुंटली, रोगांचा प्रादुर्भाव झाला. आता पाऊस पडतो की नाही, अशी स्थिती उद्भवली. १६ आॅगस्ट रोजी मघा निघाल्या. पहिले दोन दिवसही कोरडे गेले. तिसऱ्या दिवसापासून पावसाचे आगमन झाले. शनिवारी पूर्वा नक्षत्रास सुरूवात झाली. मध्यंतरी बारा दिवस नियमित पाऊस झाला. दोन महिन्यांत जेवढा पाऊस झाला तेवढा पाऊस या नक्षत्रात पडला. त्यामुळे शेवटची घटका मोजणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले. पिके खुलली, हिरवी पडली. शेतकऱ्यांच्याही जिवात जीव आला. जिल्ह्यात हिंगोली आणि कळमनुरी अनुक्रमे १७७ आणि २२९ मिमीची सरासरी इतर तालुक्यांच्या मानाने मागे पडली. मागील वर्षी सर्वात मागे असलेल्या सेनगाव तालुक्याने २५२ मिमीसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. मघाने उत्पादकांना दिलास दिला, पिकांना वरदान मिळाले. सर्वत्र पिके वाढीस लागली. चाराटंचाई दूर झाली. पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली; परंतु जनावरांच्या पाण्याचा प्रश्न संपलेला नाही. बहुसंख्य औढे, नाले कोरडे असल्याने नद्यांना पाणी आलेले नाही. काही ठिकाण वगळता ओलीला ओल गेली नाही. परिणामी नद्यांना पाणी वाहिले नाही. कयाधू आणि असना वगळता पूर्णा आणि तिच्या उपनद्या कोरड्याच आहे. काही छोटेमोठे ओढे, नाले वगळता कोठेही पाणी वाहिलेले नाही. (प्रतिनिधी)शनिवारी रात्री जोरदार पाऊसहिंगोली : जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असताना रात्री ७ वाजता जोरदार पावसास सुरूवात झाली. सुरूवातीचे १० मिनीटे दमदार पाऊस झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस होता. मेघ गर्जनासह अधूनमधून चांगला पाऊस झाला. या पावसामुळे सरासरीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. अद्यापही ओलीला ओल गेली नसल्याने हा पाऊस पिकांसाठी लाभदायक ठरला. कळमनुरीत तीन दिवस पाऊसकळमनुरी : मागील तीन ते चार दिवसांत शहर व परिसरात बऱ्यापैकी पाऊस झला. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाल्याने शेतकरी आनंदित झाले.तालुक्यात यावर्षी काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरण्यांना सामोरे जावे लागले. पाऊस उशिरा पडल्याने मूग, उडदाच्या पेरण्या कमी झाल्या. यावर्षात प्रथमच २८ आॅगस्ट रोजी १६३ मि.मी. पाऊस पडला. हंगाम जाण्याच्या अवस्थेत असल्याने शेतकरी हताश झाला होता; परंतु तीन दिवसांत पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. २६ आॅगस्ट रोजी ७१ मि.मी., २७ आॅगस्ट रोजी, १७, २८ आॅगस्ट रोजी १६३ आॅगस्ट रोजी १६३ तर ३० आॅगस्ट रोजी ७५ मि.मी. पाऊस पडला. आतापर्यंत २२९.८२ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. या तीन महिन्यांत जोरदार पाऊस झाला नाही. यापूर्वी पीके संकटात सापडली होती. काही ठिकाणीची पिके माना टाकू लागल्या होत्या; परंतु ३ दिवसांत पडलेला पाऊस पिकांसाठी संजीवनी ठरला आहे. या पावसाने पिकांची झपाट्याने वाढ होईल, असे तालुका कृषी अधिकारी डी.बी. काळे यांनी सांगितले. मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी ५० टक्के पेक्षाही कमी पाऊस झाला. पोळा गेला तर दमदार पाऊस पडला नाही. झड एकदाही लागली नाही. त्यामुळे अजूनही नाले, तलाव, विहिरी कोरड्याठाकच आहेत. या हंगामात कमी पाऊस झाल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजुनही जोरदार पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा रब्बीच्या पिकांवर परिणाम होणार असल्याचेही काळे म्हणाले. (वार्ताहर)गणपती बप्पा आले दमदार पाऊस घेऊनऔंढा नागनाथ : गणपती बाप्पाचे आगमन होताच सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला असून, हा पाऊस तालुक्यात सर्वदूर झालेला असला तरी धरणे, तलाव व विहिरींच्या पाणीपातळीत मात्र वाढ झाली नाही. अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, कापूस, मुग, तूर आदी पिकांनी माना खाली टाकल्या होत्या. मंगळवारी पावसास सुरूवात झाली. बुधवारी तर चांगलाच पाऊस झाला. हा पाऊस तालुक्यातील सर्वच गावामध्ये झाल्याने पिकांनाही उपयुक्त ठरले. आतापर्यंत तालुक्यात ४१४ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. या पावसामुळे पिकांना जरी जीवदान मिळालेले असले तरी तालुक्यातील सेंदुरसेना, पिंपळदरी, वाळकी, औंढा नागनाथ, जामगव्हाण येथील तलावात पाणी साठा वाढलेला नाही. त्याचप्रमाणे ओढे-नाले कोरडेच असून, विहिरींमधील पाण्यामध्ये अल्पशी वाढ झालेली आहे. अजून पावसाची आवश्यकता आहे. (वार्ताहर)पिकांना जीवदान; उताऱ्यावरही परिणामवसमत : प्रदीर्घ विश्रांतीनंतर वसमत तालुक्यात दमदार पावसाचे पुनरागमन झाले आहे. सर्वदूर व दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यासह पिकांनाही चमक आली आहे. यापावसाने उभी पिकांना जीवदान मिळाले आहे; परंतु उताऱ्यात मात्र फटका बसणार हे सुद्धा निश्चित झाले आहे. पोळा सणाच्या पूर्वसंध्येपासून वसमत तालुक्यात चांगला भिज पाऊस होत आहे. आजवर २४५.४५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. शुक्रवारी दिवसभर पाऊस होता. शुक्रवारी ४५ मि.मी. पाऊस झाला आहे. आजपर्यंत सरासरीपेक्षा केवळ ३० टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे तलाव, नदी-नाले भरलेले नाहीत. परिणामी जमिनीची पाण्याची भूक अद्यापही बाकीच आहे. उभ्या पिकांना जीवदान या पावसाने तान दिल्यामुळे पिकांसोबत शेतकऱ्यांचे चेहरे कोमेजून गेले होते. पिके हातची जाण्याची भीती सतावत होती; परंतु पाऊस सुरू झाल्याने सुगी टिकणार यावर, आता शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भात तहसीलदार अरविंद नरसीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाऊस झाल्याने तालुक्यातील पीकपरिस्थिती सुधारली असल्याचे सांगितले. तालुक्यात सध्यातरी पाणीटंचाईची परिस्थिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.तालुका कृषी अधिकारी बी.पी. कदम यांनी या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असलेतरी भविष्यातील चारा टंचाई व पाणीटंचाईचा प्रश्न कायमच आहे, असे सांगितले. आजपर्यंत केवळ ३० टक्केच पाणी झाले असल्याने जमिनीची भूक कायमच असल्याचे मत त्यांनी मांडले. (वार्ताहर)
‘मघा’त सातत्य तर ‘पूर्वा’चा प्रारंभही पावसाने
By admin | Updated: August 31, 2014 00:15 IST