जालना : जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात १० मार्चपर्यंत मग्रारोहयो कामे सुरू करण्याचे नियोजन करूनही कामे सुरू न झाल्याच्या मुद्यावरून बुधवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी गदारोळ केला. अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील बालमृत्यूंचे प्रमाण वाढलेले असताना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कसलीच कारवाई न झाल्याबद्दल सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदविले.दुपारी २.३० वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष तुकाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभेला प्रारंभ झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, सभापती ए.जे. बोराडे, शहाजी राक्षे, मीनाक्षी कदम, लिलाबाई लोखंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख व पी.टी. केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदस्यांमधून सतीश टोपे व संभाजी उबाळे यांनी मग्रारोहयोचा मुद्दा मांडला. एकीकडे दुष्काळी स्थितीतही ग्रामीण भागात मग्रारोहयोची कामे सुरू होत नसल्याबद्दल या सदस्यांनी खंत व्यक्त केली. विशेष म्हणजे तालुकानिहाय कामे वाटपाचे नियोजन करूनही १० तारखेनंतर कामेच सुरू नसल्याचे या सदस्यांनी सांगितले. टोपे म्हणाले, पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्याने ग्रामीण भागात विकासाची तर सोडा दुष्काळी निवारणाची कामे देखील होत नाहीत. सत्ताधाऱ्यांची मानसिकता नसल्याने ही स्थिती असल्याचा आरोप करून टोपे यांनी पदाधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामे दिले पाहिजे, अशी मागणी केली.सुखापुरी येथे बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याचा मुद्दा उबाळे यांनी लावून धरला. त्यावर प्रशासनाने काहीच ठोस कारवाई केली नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भटकर यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून २० मार्चपर्यंत खुलासा मागविण्यात आल्याचे सांगितले. ४दरम्यान, एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. भटकर यांनी सुखापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर तपासणीसाठी गेल्यानंतर आवश्यक कागदपत्रे सापडली नसल्याचे कबूल केले. या प्रकाराबद्दल संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी सांगितले.
‘मग्रारोहयो’वरून गोंधळ
By admin | Updated: March 19, 2015 00:16 IST