दिगंबर गुजर , कुंभार पिंपळगावघनसावंगी तालुक्यातील बालविकास प्रकल्पच मागील चार वर्षांपासून रिक्तपदांच्या आजारात अडकला आहे. प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतील अधिकाऱ्यांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्याच हाती असल्याने या प्रकल्पातंर्गत असणारी नागरिकांची कामे रेंगाळत आहेत.महिला व बालकांचा सर्वांगिण विकास, ० ते ६ वर्ष वयोगटांतील बालकांचा विकास करणे, त्यांना सकस आहार देवून कुपोषण मुक्त करणे आदी विविध उद्दिष्टे समोर ठेवून शासनाने महिला व बाल विकास प्रकल्पाची स्थापना केली. त्याद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहे.घनसावंगी तालुक्यात बालविकास प्रकल्प १ आणि प्रकल्प दोन अंतर्गत विविध अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांना, गरोदर व स्तनदा महिलांना सकस आहार पुरविले जातात. मागील चार वर्षांपासून या दोन्ही प्रकल्पांतील प्रकल्प अधिकाऱ्यांचे पदे रिक्त आहेत. या दोन्ही प्रकल्पावर सुनंदा झरे यांची प्रकल्प अधिकारी म्हणून प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे. तसेच अंबड येथील पदभारही झरे यांच्याकडेच आहे. एकाच अधिकाऱ्यांकडे तीन प्रकल्पाचा प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे. घनसावंगीतील बालविकास प्रकल्प २ मध्ये एकूण १४१ अंगणवाड्यांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या कार्यालयातील कामे एकाच कर्मचाऱ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडीअडचणी सोडण्यास वेळ लागत आहे. या प्रकल्पात प्रकल्प अधिकारी, कनिष्ठ लिपिक-२, कनिष्ठ लेखापाल -१, शिपाई- १ असे पदे रिक्त आहेत. प्रकल्प १ व २ चे कार्यालय एकाच इमारतीत आहे. चार वर्षांपासून हे पदे रिक्त असतानाही ते भरण्यासाठी कार्यालयालयाकडून वारंवार मागणी होऊनही याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. बालविकास प्रकल्प २ मध्ये १४१ अंगणवाड्या आहेत. त्यांना पोषण आहाराचा पगार, मानधन वाटप, खिचडी अहवाल, कॅश बुक लिहणे, आॅन लाईन माहिती पुरविणे, पोषण आहाराची गुणवत्ता यादी पाठविणे आदी अनेक कामे रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांअभावी विस्तार अधिकाऱ्यांनाच करावी लागत आहे. ४संपूर्ण कार्यालयाचा भार हा विस्तार अधिकाऱ्यावर चालत आहे. त्यामुळे या कार्यालयातील अनेक कामे खोळंबलेली आहेत.प्रकल्प २ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात बाल कल्याण, मुख्यकार्यकारी अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार करण्यात आला असल्याचे विस्तार अधिकारी बि. जे, वरखडे यांनी सांगितले. दरम्यान, पारडगाव, जिरडगाव, विरेगाव, जांबतांडा, क्रांतीनगर, राजाटाकळी, गुंज, नागोबाचीवाडी, शिवनगाव, भादली, श्रीपत धामनगाव या गावांतील अंगणवाडी सेविकेचे पदेही रिक्त असल्याने ते ही भरण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
रिक्तपदांचा आजार कायम
By admin | Updated: September 4, 2014 01:23 IST