औरंगाबाद : महापालिका प्रशासन शहरातील कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने होत असल्याचा दावा करीत असले तरी चिकलठाणा येथील कचरा प्रकल्प परिसरात प्रक्रिया करून उरलेला कचरा जाळण्याचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
या प्रकारामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. त्यातच भटक्या कुत्र्यांचा त्रास देखील वाढल्याने नारेगाव डेपोनंतर कचरा डेपोचा नवीन अध्याय चिकलठाण्यासह इतर प्रक्रिया प्रकल्प आवारात सुरू झाल्याचे दिसत आहे. यावर पालिका प्रशासन सध्या तरी गप्प आहे.
नारेगाव येथे कचरा टाकण्याला विरोध करणारे जनआंदोलन झाल्यानंतर शासनाने पालिकेला कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी १०० कोटींहून अधिक रुपयांचा निधी दिला. त्यातून चिकलठाणा, पडेगाव व कांचनवाडी भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला. चिकलठाणा व कांचनवाडी प्रक्रिया प्रकल्पात कचऱ्यापासून खत निर्मिती होत असली तरी दरमहा हजारो टन वेस्टेज कचरा खतनिर्मितीविना बाहेर पडत आहे. प्लास्टिक, कुजलेल्या कपड्यांसह इतर साहित्याचा त्यात समावेश असतो. तो कचरा पेटवून देण्याचा सपाटा मनपा नियुक्त कंत्राटदाराने लावल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. प्रकल्पाच्या पाठीमागे कचऱ्याचे ढीग साचले असून, ते कमी करण्यासाठी आग लावली जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी मनपाचे घनकचरा प्रकल्पप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना संपर्क केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
भाजीपाल्याचे नुकसान
कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या परिसरातील शेतात भाजीपाल्याची लागवड केली जाते. मात्र, कचऱ्यामुळे माशांचे प्रमाण वाढले. या माशांमुळे भाजीपाल्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. कचऱ्याच्या धुरामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने शेतीत काम करणे अवघड झाले आहे. चिकलठाणा व पडेगाव येथील प्रकल्पांची क्षमता दररोज दीडशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. मात्र, येथे जास्त कचरा आणला जातो. चिकलठाण्यात दररोज सुमारे दोनशे टन कचरा टाकला जातो. त्यामुळे कचऱ्याचे ढीग वाढले आहेत.