औरंगाबाद : मनपाच्या थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी सर्वसामान्य नागरिकांना गुन्हेगारांप्रमाणे नोटिसा बजावून आयुक्तालयात बोलावून ‘खाक्या’ दाखविण्याचा मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया आणि पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलेला प्रयत्न थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबादचे संपर्क नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दोन्ही आयुक्तांना समज देण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी मनपाने शहरातील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीदारांना नोटिसा पाठविल्या. त्यात आपल्याकडे अमुक अमुक इतकी थकबाकी आहे. त्यासाठी आपण बुधवारी पोलीस आयुक्तालयात हजर राहावे, असे सांगण्यात आले होते. गुन्हेगारांप्रमाणे ‘हजेरी’साठी पोलीस आयुक्तालयात बोलावल्याने थकबाकीदारांमध्ये एकच खळबळ उडाली.
दंडुकेशाहीची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे
By admin | Updated: June 10, 2016 00:06 IST