औरंगाबाद : लघुदाब वीजवाहिनीवर आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या कंपनीवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईत दोन वर्षांत सुमारे २० हजार ११५ युनिटची वीजचोरी केल्याच्या आरोपावरून उद्योजकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविला. रेल्वे स्टेशन औद्योगिक वसाहतीत सोमवारी (दि. २५) ही कारवाई झाली.
सुभाषचंद्र रतनलाल जैन असे आरोपी उद्योजकाचे नाव आहे. जैन यांची रेल्वे स्टेशन एमआयडीसीमध्ये मराठवाडा स्पन पाईप को-ऑपरेटिव्ह लिमिटेड नावाची कंपनी आहे. महावितरणच्या पथकाने २५ जानेवारी रोजी अचानक त्यांच्या कंपनीवर छापा टाकून तेथे चालविण्यात येणाऱ्या विविध उपकरणांचा वीजपुरवठा तपासला. तेव्हा कंपनीत महावितरणच्या लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून पाण्याचे सहा मोटार पंप चालविले जात असल्याची वीजचोरी उघडकीस आली. महावितरणचे अधिकारी योगेश वाल्मिक जाधव यांनी आरोपी जैनविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनुसार दोन वर्षांपासून या कंपनीने सुमारे २० हजार ११५ युनिटची चोरी केली. पोलिसांनी आरोपी जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.