उस्मानाबाद : पोस्ट विभागाच्या वतीने रविवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रावर पोस्टमन, मेलगार्ड पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली़ मात्र, अंध, अपंग परिक्षार्थींच्या ‘रायटर’च्या शिक्षणावर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांनी विरोध केल्याने जवळपास २५ परीक्षार्थी परिक्षेला मुकले आहेत़ पोस्ट विभागाच्या वतीने रविवारी दुपारी २ ते ४ या कालावधीत शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, सरस्वती विद्यालय, महाजन वरिष्ठ महाविद्यालय आदी विविध परीक्षा केंद्रावर पोस्टमन, मेलगार्ड पदासाठी परीक्षा घेण्यात आली़ परीक्षा केंद्रात गेलेल्या अंध, अपंग विद्यार्थ्यांनी सोबत आणलेल्या रायटरच्या शिक्षणावरून काही अधिकाऱ्यांनी रायटर घेण्यास विरोध केला़ दहावीच्या गुणांवर ही परीक्षा असल्याचे सांगत उच्च शिक्षित रायटर घेण्यास विरोध दर्शविला़ अनेक विद्यार्थी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यासह लातूर, बीड जिल्ह्यातून आले होते़ मात्र, येताना रायटर म्हणून एकालाच सोबत आणण्यात आले होते़ ऐनवेळी दुसरा रायटर आणायचा कुठून ? असा अनेकांसमोर प्रश्न होता़ अनेकांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पर्यवेक्षकांना विनंती केली़ मात्र, याचा काहीच परिणाम झाला नाही़ त्यामुळे लातूर जिल्ह्यातील ताहेर तांबोळी, दत्ता करदोरे, दत्ता कांबळे, रोहिदास कांबळे, अमर ढगे, विशाल लोहारे, गोविंद दहिफळे, दीपक बिराजदार, गौतम भालेराव, कासीम बेग, सौदागर रत्नपारखे, आतीश बंडगर, रामेश्वर राजे, शंकर शेळकर यांच्यासह जवळपास २५ परीक्षार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही़ या प्रकारामुळे परीक्षेचा अर्ज भरल्यापासून परीक्षेच्या दिवसापर्यंत अहोरात्र मेहनत केल्यानंतर अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागल्याने परीक्षार्थींमधून संताप व्यक्त होत होता़ शिवाय अनेकांचे डोळे पाणावले होते़ याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले़ दरम्यान, याबाबत पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही़ (प्रतिनिधी)
‘रायटर’ वरून उडाला गोंधळ
By admin | Updated: March 30, 2015 00:41 IST