जालना : गेल्या चार वर्षांपासून वैयक्तिक लाभाच्या अव्वा की सव्वा विहिरींच्या कामांना मंजुरी देऊन कुशल देयके कोट्यवधीपर्यंत थकीत आहेत. तर मंजुरीपैकी ५० टक्केही कामे अद्याप झालेली नाहीत. त्यामुळे मग्रारोहयोतून वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींची कामे जवळपास बंद करण्याचा निर्णय सरकारी यंत्रणेने घेतला आहे.२०१०-११ या वर्षापासून मग्रारोहयोअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या ११ हजार २७ सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र या विहिरींची कामे करताना ६०:४० चे प्रमाण राखण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. मनुष्यबळाचा मोबदला दिला जातो. मात्र साहित्यावरचा खर्च देणे शक्य होत नाही. त्यामुळे कुशलचे पेमेंट कोट्यवधी रुपयांपर्यंत थकीत झाले. परिणामी प्रशासकीय कामात अडचणी निर्माण होऊ लागल्या. ६०:४० चे प्रमाण राखणे मुश्किल झाले. त्यामुळे आता २०१४-१५ पासून वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींना मान्यता देणे जवळपास बंद झाले आहे. त्याऐवजी रस्ते, नालाबांध, संरक्षण भिंती इत्यादी कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. विहिरींची जी कामे मंजुर आहेत, ती पूर्ण करण्यात येणार आहेत. परंतु नवीन मंजुरी देण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मग्रारोहयोअंतर्गत जिल्ह्यात मंजुर असलेल्या ११ हजार २७ विहिरींच्या कामांपैकी ८ हजार ६३७ कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी ३ हजार ९२४ कामे पूर्ण झाली. तर ४ हजार ७१३ कामे अपूर्ण आहेत. अपूर्ण कामांमध्ये अंबड तालुक्यात २५८, बदनापूर ४६१, भोकरदन ५८६, घनसावंगी ११८७, जाफराबाद २४३, जालना ३६१, मंठा १०९०, परतूर तालुक्यात ५२७ कामांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)सरकारी यंत्रणेने घेतलेल्या या निर्णयामुळे काही पुढाऱ्यांच्या आततायीपणाला आळा बसणार आहे. प्रशासकीय यंत्रणेवर दबावतंत्राचा वापर करून काही मंडळींनी एवढ्या मोठ्या संख्येने विहिरींच्या कामांना मान्यता घ्यावयास लागली, असे सूत्रांनी सांगितले. एकूण मंजुर विहिरींच्या कामांमध्ये अंबड तालुक्यात ७४०, बदनापूर १७४६, भोकरदन २२९०, घनसावंगी १८४९, जाफराबाद ६३८, जालना ९८६, मंठा १६५७, परतूर तालुक्यात ११२१ कामांचा समावेश आहे.
वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे बंद
By admin | Updated: December 24, 2014 01:00 IST