जालना : वीज गळतीचे प्रमाण कमी केल्याचा डांगोरा पिटवणाऱ्या वीज वितरण कंपनीकडून विद्युत तारांवर आकडे टाकून खुलेआम विजेचा वापर करणाऱ्या शहरात विविध भागातील वीज चोरांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी ‘लोकमत चमू’ ने जुना जालन्यात केलेल्या स्टींग आॅपरेशनद्वारे समोर आणला आहे. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यावरून दिसतील, अशाप्रकारे हे आकडे टाकण्यात आलेले आहेत. महावितरणकडून मात्र ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ या म्हणीप्रमाणे जे ग्राहक नियमितपणे बिले भरतात, अशांनाच कायद्याचा दंडुका दाखविला जात असल्याची ग्राहकांमध्ये चर्चा आहे. शहरात विविध भागांमध्ये अशाप्रकारे वीज चोरी चोवीस तास खुलेआम सुरू असते. जुना जालन्यातील नूतन वसाहतकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरून तारांवर आकडे टाकलेले दिसले. यात काही उच्चभू्र घरांचाही समावेश आहे. काही व्यावसायिक आहेत. नूतन वसाहत मुख्य रस्त्यावर १५ ठिकाणी तारांवर आकडे टाकल्याचे निदर्शनास आले. याच उड्डाणपुलाखालून विद्युत कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील ठिकठिकाणी विद्युत तारांवर आकडे टाकलेले होते. इंदिरानगर भागातही अनेक ठिकाणी तारांवर आकडे टाकून वीज चोरी करण्यात येत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. या भागात गेलेल्या मुख्य वाहिनीवरील विद्युत तारांवर आकडे टाकल्याचे संबंधितांना माहिती आहे, परंतु कारवाई कुणीच करीत नसल्याचे या भागातील काही नागरिकांनी सांगितले. शास्त्री मोहल्ला भागातही काही घरांमध्ये आकडे टाकून सर्रासपणे वीजचोरी केली जात आहे. बांबूच्या सहाय्याने आधार देऊन तारांवर आकडे टाकण्यात आलेली आहेत. कुच्चरओटा, नीळकंठ भाग परिसर या ठिकाणीही आकडे टाकलेले आहेत. काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षानुवर्षांपासून आकडे टाकून वीजचोरी होत आहे. कैकाडी मोहल्ला भागात काही ठिकाणी हीच स्थिती आहे. या वीज चोरांकडून आतापर्यंत लाखो रुपयांच्या विजेची चोरी झाल्याची शक्यता आहे. एकीकडे सर्रासपणे वीज चोरी करणाऱ्यांकडे महावितरणकडून दुर्लक्ष केले जात आहे. तपासणी पथकांकडून केवळ फार्स केला जात आहे. चोरी पकडल्याची कार्यवाही केल्याचे उद्दिष्ट साधण्यासाठी काही ठिकाणी छापे मारल्याचे दर्शवून वीज चोरी ही तांत्रिक बाबींद्वारे वीज गळती दाखविली जात आहे. (लोकमत चमू)वीज वितरण कंपनीतील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, काही उच्चभ्रू वसाहतींमध्ये भरारी पथकाकडून छापे मारले जातात. मात्र अन्य काही उच्चभू्र वसाहती तसेच झोपडपट्टी भागात या भरारी पथकाकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. कारण तेथे पंच मिळत नाहीत, असा या पथकातील काही जणांचा दावा आहे. ४वास्तविक वीज चोरी हा कायद्यान्वये गुन्हा आहे. तो कोणत्या व्यक्तीशी, श्रीमंत अथवा गरीबीशी संबंधित नाही. मात्र वीज वितरण कंपनीकडून अशाप्रकारे भेदभाव जर होणार असेल तर तो चुकीचा आहे, अशी प्रतिक्रिया काही ग्राहकांनी ‘लोकमत चमू’ शी बोलताना व्यक्त केली.वीज चोरी ...़ जुना जालन्यातील नूतन वसाहत, कुच्चरओटा, इंदिरानगर, विद्युत कॉलनी रोड, शास्त्री मोहल्ला या परिसरात सोमवारी तारांवर आकडे टाकून खुलेआम वीज चोरी सुरू होती. काही भागात वर्षानुवर्षे वीज चोरी होत असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
खुलेआम वीजचोरीकडे साफ दुर्लक्ष..!
By admin | Updated: November 25, 2014 00:56 IST