हिंगोली : स्मशान म्हटल्यावर भूत, प्रेत अशा अंधश्रद्धाळू भयामुळे एकही माणूस सहसा तिकडे फिरकत नाही. त्यामुळे तेथे शांतता असते. या ठिकाणाचा अभ्यासासाठी चांगला उपयोग होऊ शकतो, ही बाब हेरून काही विद्यार्थ्यांनी मागील काही वर्षांपासून येथील ख्रिश्चन स्मशानभूमीला अभ्यासिका केंद्र बनविले आहे. दिवसेंदिवस शैक्षणिक असो व स्पर्धा परीक्षा त्यातील स्पर्धा जीवघेणी होत चालली आहे. वाढत्या गुणवत्तेशी तोंड देताना अभ्यासाशिवाय पर्याय उरला नाही. मात्र त्यासाठी पोषक वातावरणही लागते. या धावपळीच्या युगामध्ये शांत वातावरण शोधूनही सापडत नाही. म्हणून शहरी भागात ‘अभ्यासिका केंद्र’ स्थापन केले जात आहेत. मात्र हिंगोलीत अभ्यासिका नावाचा प्रकारच उदयास आलेला नाही. एकीकडे पहिल्या वर्गापासून ते स्पर्धा परीक्षेपर्यंत ज्ञान शाखा वाढत गेल्या आहेत. परिणामी, वर्षभर विद्यार्थी अभ्यासात गुंतून पडत आहे. पण कमी वेळेत अधिक अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी शांत वातावरण शोधत असतात. हिंगोलीत असे वातावरण देणाऱ्या ग्रंथालय किंवा अभ्यासिका नसल्यामुळे नैैसर्गिक वातावरणाचा शोध विद्यार्थ्यांनीच लावला आहे. त्यासाठी विज्ञानावर विश्वास ठेवणारी ही पिढी स्मशान शांततेचाही अभ्यासासाठी उपयोग करायला तयार आहे. शहरालगतच्या ख्रिश्चन समाज बांधवांच्या जुन्या स्मशानभूमीत विद्यार्थी त्यामुळेच मोठ्या संख्येने येतात. तेथील वड, लिंब, पिंपळाच्या सावलीला एसी समजून अभ्यास सुरू असतो. अत्यंत शांत वातावरणामुळे अभ्यासात अडथळा येत नाही. आकलनक्षमताही वाढते. अंधश्रद्धेतून रात्री सोडा दिवसाही अनेक जण स्मशानभूमीत जात नाहीत. भूत-प्रेताने झपाटले तर कसे? असे म्हणून चाचरतात. मात्र विज्ञानाची कास धरत स्पर्धेत टिकण्यासाठी झपाटलेले हे विद्यार्थी अभ्यासावरच श्रद्धा ठेवत स्मशानातून यशाचा मार्ग पादाक्रांत करीत आहेत.(प्रतिनिधी)
ख्रिश्चन स्मशानभूमीच बनली अभ्यासिका केंद्र
By admin | Updated: November 8, 2014 23:38 IST