कायगाव : कोणत्याही क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात उदरनिवार्हासाठी जीवघेणी कसरत करणाºया चंद्रकलाबाई लकारे यांना पाहिल्यावर येतो.जुने कायगाव येथे गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांचा संगम होतो. तसेच या भागात रामेश्वर, सिद्धेश्वर, मुक्तेश्वर, घटेश्वर आणि कायेश्वर आदी पुरातन मंदिरे आहेत. त्यामुळे विविध धार्मिक कार्यासाठी, गंगास्नानासाठी आणि दर्शनासाठी या भागात येणाºयांची संख्या मोठी आहे. ही सर्व पुरातन मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. काही प्रवरा नदीच्या काठी, काही गोदावरी नदीच्या काठी तर काही मंदिरे दोन्ही नद्यांच्या संगमावर उभी आहेत. त्यामुळे येणाºया भाविकांना होडीत बसवून सर्व मंदिरांच्या दर्शनाला नेण्याचे काम चंद्रकलाबाई करतात. रामेश्वर मंदिरापासून होडीवर बसवून त्या भाविकांना मुक्तेश्वर मंदिर ते सिद्धेश्वर मंदिर अशा सर्व मंदिरांचे दर्शन करून आणतात. गोदावरी आणि प्रवरा या दोन्ही नद्यांचे पात्र प्रचंड खोल आणि पसरट आहे. अनेकदा येथे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र लहानपणापासून नदीच्या पात्राजवळ राहून नदीची भीती नाहीशी झाल्याचे चंद्रकलाबाई सांगतात. या कामातून पुण्याचे काम करत असल्याचा आनंद मिळत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
गोदापात्रात होडी हाकण्यासाठी कसरत करणा-या चंद्रकलाबाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:11 IST