नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत महापालिकेसमोर मार्च २०१५ पर्यंत ५ हजार ५६० घरे बांधण्याचे आव्हान असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासन कामाले लागले आहे़ शहरात मागील चार वर्षात १३ हजार ६११ घरकुले बांधून पूर्ण झाले असून २ हजार ९१८ घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत़शहरात २७ हजार ९८५ पैकी एनटीसी मिल परिसरातील ५१३६ घरकुले वगळून आता २२ हजार ८९ घरांचे उद्दिष्ट समोर आहे़ परंतु योजनेचा कालावधी मार्च २०१५ मध्ये संपत असल्याने मंजूर घरकुलांपैकी डीपीआर १ व २ मधील १ हजार ८७५ घरे शासनाकडे परत करण्यात येणार आहेत़केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मूलन मंत्रालयाने शहरी भागातील झोपडपट्टीवासियांचे जीवनमान उंचावण्यासाठी शहरी गरीबांना मुलभूत सुविधा पुरविणे ( बीएसयुपी ) या योजनेतंर्गत शहरातील १६६ विविध वस्तीत २०१० पासून घरकुलांचे कामे सुरू आहेत़ या योजनेला २००६ मध्ये मंजुरी मिळाली होती़ झोपडपट्टी मुक्त शहराच्या निर्मितीसाठी गोरगरिबांना राहण्यासाठी पक्के घरे देण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनली आहे़ योजनेचा कालावधी संपत असताना अनेक लाभार्थी घरकुल मंजूर असल्याचे सांगून आता मार्कआऊटसाठी मनपात धाव घेत आहेत़ मनपातील बीएसयुपी विभागात लाभार्थ्यांची रेलचेल वाढल्याने अनेक नगरसेवकही कामाला लागले आहेत़ आपापल्या वार्डातील लाभार्थ्यांचे काही काम राहिले आहे का, अशी विचारणा करीत ते सुद्धा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांकडे येऊन ठाण मांडत आहेत़ दरम्यान, आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे यांनी १५ डिसेंबरपर्यंतच लाभार्थ्यांना मार्कआऊट देण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यामुळे वैयक्तिक व कंत्राटदाराकडून काम करून घेण्याऱ्या लाभार्थ्यांनी अखेरच्या टप्यात घरकुलांच्या मार्कआऊटसाठी प्रयत्न चालविले आहेत़ तर उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सबकंत्राटदारांना नियुक्त करून राहिलेले कामे पूर्ण करण्यात येत आहेत़ ब्रह्मपुरी वगळता शहरातील सर्व झोन अंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांच्या कामांची जबाबदारी कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांच्याकडे सोपविल्याने लाभार्थ्यांनी त्यांच्या कक्षात गर्दी केल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे़ १५ डिसेंबरपर्यंतच मार्कआऊट देण्यात येणार असल्याने नगरसेवकही आपल्या वार्डातील लाभार्थ्यांच्या मदतीला धावताना दिसत आहेत़ (प्रतिनिधी)४ झोननिहाय घरकुलांच्या कामांची स्थिती पुढील प्रमाणे़ शिवाजीनगर झोन क्रं़ १ - एकूण ५हजार १०५ पैकी ३ हजार ६८३ पूर्ण, अशोकनगर झोन क्रं़ २ - एकूण ४ हजार ७८२ पैकी ३ हजार २१२, इतवारा झोन क्रं़ ३ - एकूण ६ हजार ४२९ पैकी २ हजार ९८५, वजिराबाद झोन क्रं़ ४ - एकूण १ हजार ६८० पैकी १हजार १९, सिडको झोन क्रं़ ५ - १ हजार ७५ पैकी १ हजार १३९, तरोडा झोन क्रं़ ६ - एकूण २ हजार १०० पैकी १ हजार ३८३ पूर्ण़ ब्रह्मपुरी येथे १ हजार ६७८ पैकी १९० घरांचे कामे पूर्ण झाले आहेत़ ४ झोननिहाय घरकुले बांधलेल्या वस्त्यांची संख्या पुढील प्रमाणे, झोन क्रं़ १ - १६, झोन क्रं़२ - २९, झोन क्रं़३ -३२, झोन क्रं़४ - ९, झोन क्रं़ ५ - २५, झोन क्रं़ ६ - ४१ व ब्रह्मुपरी भागात एका नगरात घरकुलांचे कामे सुरू आहेत़
साडेपाच हजार घरे बांधण्याचे आव्हान
By admin | Updated: November 28, 2014 01:08 IST