लातूर : लातूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला कायमस्वरूपी अध्यक्ष मिळणे मुश्कील झाले आहे. मध्यंतरी एक-दीड महिना अध्यक्षाविना ही समिती होती. पूर्वी औरंगाबाद आणि लातूरचा पदभार असलेले अध्यक्ष होते. आता एक महिन्यापूर्वी अध्यक्ष मिळाले आहेत. परंतु, तेही प्रभारी आहेत. या ना त्या कारणाने लातूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला कायमस्वरूपी अध्यक्षांची कमतरताच राहत आहे.लातूरच्या विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अंतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या चार जिल्ह्यांतील जात प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाते. विभागीय कार्यालयाच्या स्थापनेपासून पडताळणी समितीला कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची कमतरताच आहे. कधी अध्यक्ष नसतात, तर कधी सचिव. तर कधी संशोधन अधिकारी. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम रेंगाळते. गेल्या एक-दोन वर्षांपासून दोन-तीन समित्यांचा पदभार असलेलेच अध्यक्ष लातूरच्या समितीला मिळत आहेत. सध्या सोलापूर समितीचा कायमस्वरूपी पदभार असलेल्या अध्यक्षांकडे लातूरच्या समितीचाही पदभार आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे अन्य समित्यांचाही पदभार असल्याचे बोलले जाते. महिनाभरापूर्वी त्यांनी लातूरच्या अध्यक्षपदाचा पदभार घेतला आहे. परंतु, दोन-तीन समित्यांचा पदभार असल्याने प्रमाणपत्रांच्या पडताळणी कामाला अद्याप वेग नाही. (प्रतिनिधी)
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला पुन्हा प्रभारी अध्यक्ष !
By admin | Updated: October 31, 2014 00:35 IST