जालना : जिल्ह्यात ग्रामपंचायतींअंतर्गत वृक्षलागवड करणे बंधनकारक करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर काही ग्रामपंचायतींना अचानक भेटी देऊन तेथील वृक्षलागवडींची जिल्हा परिषद सीईओ प्रेरणा देशभ्रतार ह्या पाहणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात वृक्षलागवडींची संख्या फारच कमी असल्याने सर्व बीडीओ व ग्रामपंचातींच्या ग्रामसेवकांना वृक्षलागवड करून त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. यात काही ग्रामपंचायतींनी प्रमाणपत्र देऊन त्यासंबंधीची माहिती वेबसाईटवर देखील टाकली. मात्र काही ग्रामपंचायतींनी अद्याप टाकलेली नाही. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाअंतर्गत शतकोटी योजनेअंतर्गत तसेच मग्रारोहयोअंतर्गत सर्व ग्रामपंचायतींना वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे बंधनकारक करण्यात आलेले होते. परंतु सद्यस्थितीतही काही ग्रामपंचायतींमध्ये वृक्षलागवडीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यंदा पाऊस कमी प्रमाणात झालेला असला तरी आॅगस्टनंतर समाधानकारक झाला. त्यामुळे वृक्षलागवड करणे बंधनकारक करण्यात आले. जेथे वृक्षलागवड केली जाणार नाही, तेथील ग्रामसेवकांचे वेतन अदा केले जाणार नाही, असे निर्देशही सीईओ देशभ्रतार यांनी दिले होते. त्याचप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीला शासनाच्या विविध योजनांमार्फत मिळणारे अनुदानही थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या तीन आठवड्यांपूर्वी सीईओंनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर काही ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. परंतु बऱ्याच ठिकाणी वृक्षलागवड झाली नसल्याचे समजते. याबाबत सीईओंनी आढावा घेतला असून काही ग्रामपंचायतींना अचानक भेटी देऊन तेथील वृक्षलागवडीची पाहणी करणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
वृक्षलागवडीची सीईओ करणार पाहणी
By admin | Updated: September 23, 2014 23:50 IST