औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव १३ डिसेंबरपासून आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठ परिसरात आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी कलावंतांमधील प्रतिभांना वाव मिळण्यासाठी विद्यापीठामार्फत युवक महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवातूनच मराठवाड्यातील अनेक कलावंत घडले आहेत. या महोत्सवामध्ये संगीत, नृत्य, एकांकिका, प्रहसन, मिमिक्री, मूकाभिनय, काव्यवाचन, वादविवाद, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा, लोककलेत पोवाडा, भारूड, वासुदेव, गोंधळ, भजन, लोकगीत, लोकनाट्य, लावणी, शास्त्रीय- सुगम गायन, वादन, चित्रकला, रांगोळी आदी कला प्रकारांचे सादरीकरण होईल. केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयांचे कलावंत विद्यार्थी व संघप्रमुखांना ५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यापीठ’ ही युवक महोत्सवाची थीम राहणार आहे.
केंद्रीय युवक महोत्सवाची जय्यत तयारी
By admin | Updated: November 30, 2014 01:00 IST