औरंगाबाद : अक्षय तृतीयेच्या दिवशी आराध्य दैवत भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात, पण घरीच साजरा करण्याचे आवाहन ब्राह्मण समाज समन्वय समितीने केले आहे.
भगवान परशुराम जन्मोत्सव शुक्रवारी (दि.१४) साजरा करण्यात येणार आहे. यंदा कोरोनामुळे व लॉकडाऊनमुळे शोभायात्रा काढण्यात येणार नाही. मागील वर्षीप्रमाणे यंदाही समाज बांधवांनी घरीच जन्मोत्सव साजरा करावा.
घरावर भगवा ध्वज लावावा, घरा समोर सडा, रांगोळी काढावी. त्यानंतर, कुटुंबासह भगवान परशुरामच्या प्रतिमेचे पूजन करण्यात यावे. नैवैद्य आरती करावी. सर्व कुटुंबाने नामस्मरण करावे.
शक्य आहे त्यांनी गोशाळेला आर्थिक मदत करावी, अनाथालये, गरजू, होतकरूंना मदत करावी. संघटनांनी सर्व सरकारी नियम पाळून भगवंताच्या प्रतिमेचे पूजन करावे. एकमेकांना न भेटता मोबाइलवरच शुभेच्छा द्याव्यात.
ज्या संघटना विविध प्रकल्प हाती घेणार आहे त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
सायंकाळी घरासमोर दिवे लावा
अक्षय तृतीयेला सायंकाळी घरासमोर दिवे लावावेत, असे आवाहन राजस्थानी विप्र समाजाने केले आहे. भगवान परशुराम यांच्या प्रतिमेची सहपरिवार पूजा करावी, स्मरण करावे, जप करावा. जन्मोत्सवानिमित्त कोरोनाबाधित रुग्णांना, त्यांच्या नातेवाइकांना मदत करावी.