उस्मानाबाद : जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या पखरूड येथील जिल्हा परिषद शाळेत तरूणांच्या पुढाकारातून ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लागले आहेत. त्यामुळे आता वर्गांसोबतच किचनशेड अन् मैदानांवरही या कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे.पखरूड येथील जिल्हा परिषद शाळेच्या विकासामध्ये ग्रामस्थांचा सहभाग नेहमीच महत्वाचा ठरला आहे. ग्रामस्थांच्या पुढाकारातून सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात. मागील काही महिन्यांपासून चोरट्यांनी शाळांना लक्ष्य केले आहे. काही शाळांतून संगणक तर काही ठिकाणाहून पोषण आहाराचे साहित्य लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासोबतच वर्गामध्ये गेल्यानंतर शिक्षक कितीवेळ शिकवितात, पोषण आहार शिजविताना संबंधित व्यक्तीकडून आवश्यक काळजी घेतली जाते का? आदी बाबींवर मुख्याध्यापकांना सहजरित्या नजर ठेवता यावी, या उद्देशाने येथील भैरवनाथ दगडू चव्हाण आणि आप्पा साधू चव्हाण या दोन तरूणांनी पुढाकार घेत शाळेमध्ये स्वखर्चाने ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसून दिले आहेत. त्याचप्रमाणे संगणक ज्ञानाची गरज लक्षात घेवून येथीलच नाना पाटील आणि जीडीपी फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने दोन संगणकही देण्यात आले.
पखरूडच्या शाळेत लागले ‘सीसीटीव्ही’
By admin | Updated: January 29, 2015 01:14 IST