हरी मोकाशे ,लातूरमागील वर्ष- दीड वर्षांपासून नागरिक व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना आखणारे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना आता इच्छेस मुरड घालण्यास काँग्रेसच्या नेतेमंडळींनी भाग पाडले आहे़ विशेष म्हणजे केवळ अडीच वर्ष कालावधीच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावर कव्हेकरांना ‘संतुष्ट’ व्हावे लागणार आहे़जिल्हा परिषदेवर काँग्रेसची एकहाती सत्ता असली तरी देशमुख आणि निलंगेकर हे अंतर्गत दोन गट असल्याचे सर्वश्रुत आहे़ त्यामुळे नागरिकांचे विधानसभा निवडणुकीकडे तर काँग्रेसमधील नेत्यांचे अध्यक्षपदाच्या निवडीवर लक्ष वेधले होते़ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी धोका होऊ नये म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी महिनाभरापासून आवश्यक ती दक्षता घेतली होती. नाममात्ररित्या पक्षाच्या सदस्यांची मते जाणून घेण्यात आली़ राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीची भूमिका कोणतीही राहो़ परंतु, आपले वर्चस्व कायम रहावे म्हणून जिल्हा परिषदेत काँग्रेसने आघाडीची भूमिका स्वीेकारत विधानसभेसाठी हातात ‘घड्याळ’ बांधले़लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून लातूर ग्रामीण मतदारसंघात कार्यकर्त्यांशी ‘जवळीकता’ साधली होती़ एवढेच नव्हे तर मार्चच्या प्रारंभी झालेल्या गारपीट, बाजार समितीतील वाद यासंदर्भात शेतकरी, व्यापारी, आडते, नागरिकांच्या भेटी घेऊन विद्यमान आमदारांच्या अगोदर ‘तोडगा’ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पर्यायी नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्नही केला़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार कव्हेकर यांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी करीत ‘जोर’ लावला. शक्तीप्रदर्शनही सुरू केले होते. कार्यकर्त्यांचा स्वतंत्र मेळावा घेऊन भूमिकाही मांडली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून कव्हेकर यांची दावेदारी होती़ या त्यांच्या इच्छेवर मुरड घालण्यासाठी देशमुख गटाने अध्यक्षपदाची ‘तडजोड’ स्विकारली़ त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या पत्नी प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांची अध्यक्षपदी वर्णी लागली़
कव्हेकरांची विधानसभा निवडणुकीतून माघार !
By admin | Updated: September 22, 2014 00:54 IST