येरमाळा : भरधाव वेगातील कार -दुचाकीची भीषण धडक होवून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले़ तर गंभीर जखमीस बार्शी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ हा अपघात रविवारी सायंकाळी तेरखेडा (ता़वाशी) नजीक घडला असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेरखेडा येथील सुरज आगलावे (वय-२१), विष्णू माळी (वय-२०) व बबन कडवकर (वय-२८) हे रविवारी सायंकाळी तिघे दुचाकीवरून (क्ऱएम़एच़१३- एक्स़७३७६) जात होते़ त्यावेळी औरंगाबादहून सोलापूरकडे निघालेल्या कारने (क्ऱएम़एच़०४- वाय़६९०९) दुचाकीस जोराची धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील विष्णू माळी, सुरज आगलावे यांचा जागीच मृत्यू झाला़ तर बबन कडवकर हा गंभीर जखमी झाला असून, त्यास बार्शी येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते़ अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य सुरू केले होते़ तर अपघातानंतर कारचालकासह इतर इसमांनी घटनास्थळावरून धूम ठोकली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़ (प्रतिनिधी)अपघाताची माहिती मिळताच येरमाळा पोलिस ठाण्याचे फौजदार डी़जी़अहंकारी, पोहेका जगताप यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ तर तेरखेडा येथील श्रीराम घुले, रणजित घुले, अप्पा वाघमारे, जिकर मुजावर, अनिल सरवदे, गणेश मिरेकर यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेवून अपघातग्रस्तांना मदत केली़ घटनेनंतर अपघातस्थळी वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती़ या घटनेत गावातीलच दोन युवक ठार झाल्याने व एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात होती़ जखमींना रूग्णालयात पाठविण्यासाठी पोलिसांसह ग्रामस्थांनी पुढाकार घेत प्रयत्न केले़ त्यानंतर मयताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी रूग्णालयात नेण्यासाठीही उपस्थित नागरिकांनीच पुढाकार घेतला होता़
कार-दुचाकीची धडक; दोघे ठार
By admin | Updated: October 27, 2014 00:10 IST